पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१४२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असल्या गोष्टींच्या मागे जावे लागते. फ्रान्सिस गॅल्टन, कार्ल पिअर्सन, रॉनाल्ड फिशर यांच्यासारख्या संख्याशास्त्रज्ञांनी मग खुशाल स्वतःला मॅडेलच्या विज्ञानांचे तज्ञ म्हणवून घ्यावे.'त्यामुळेच आमच्या इथले अकॅडेमिशिअन नेमचिनोव्ह आपल्या संख्याशास्त्राच्या जोरावर आम्हांला सांगतात की, रंगसूत्रांवर आधारित अनुवांशिकताच बरोबर आहे !' हशा नि टाळ्या.
 दुर्दैवाने लायसेंको आणि त्याच्या अनुयायांना गणित आणि संख्याशास्त्राची अजिबात समज नसावी. लायसेंको एका व्याख्यानात म्हणतो की, पदार्थविज्ञान व रसायनशास्त्रात संभाव्यता (प्रॉबेबिलिटी) लागत नाही हे कसे ? विज्ञानाच्या सर्व शाखात नियम कसे पक्के असले पाहिजेत. हेही शक्य, तेही शक्य असला भोंगळपणा चालणार नाही. म्हणूनच मेंडेलवाद फेकून दिला पाहिजे.
 खरे तर पदार्थविज्ञानातही अनिश्चितता तत्त्व या काळापर्यंत प्रस्थापित झाले होते.मूलकणांची गती आणि दिशा या दोन्ही गोष्टी एकाच वेळी निश्चित करता येत नाहीत हे मान्य झाले होते. शिवाय जीवशास्त्रात अनेक गोष्टी अशा आहेत की, त्यात एका घटनेबद्दल खात्री देता येत नाही.लायसेंकोने वाढवलेल्या गव्हाच्या लोंजीमधे किती दाणे असतील हे सांगणे अवघडच आहे. एका झाडाला किती फळे लागतील हे कोण छातीठोकपणे सांगणार ? पण सरासरी उत्पादनाबद्दल जास्त भरवशाने बोलता येते.एखादा मनुष्य अमुक एका वर्षात मरेल की जगेल कोण जाणे, पण त्याच्या वयाची त्याच्या प्रकारचे काम करणारी हजारो माणसे एकत्रपणे विचारात घेतली, तर त्यांच्यापैकी किती मरतील याचा चांगला अंदाज करता येतो. म्हणून तर विमा कंपन्या चार पैसे मिळवू शकतात. गणित आणि संख्याशास्त्राच्या वापराने समकालीन तज्ञ उत्क्रांतिवादामधे झपाट्याने प्रगती करत होते. पण झापडे लावलेल्या लायसँको- वाद्यांना ते सर्व अगम्यच राहिले.

 एच्. जे. म्यूलर, प्राध्यापक, इंडियाना विद्यापीठ, नोबेल पारितोषिक विजेता,जेनेटिक्स सोसायटी ऑफ अमेरिकाचा माजी अध्यक्ष याने २४ सप्टेंबर १९४८ रोजी' सोवियत युनियन अकॅडमी ऑफ सायन्स 'ला एक पत्र लिहून लायसैको प्रकरणा- विषयीच्या आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. अनेक अप्रेसर वैज्ञानिक आणि विचार- वंत यांच्या सार्वत्रिक भूमिकेचे त्यात प्रतिबिंब पडले आहे. या पत्रातील काही भाग

लायसेंकोचा उदयास्त / १११