पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१७६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पण तरी त्यांना चारदोन शब्दांपलीकडे प्रगती करता येत नाही.माणसाजवळ त्याच्या स्वरयंत्राचा उत्तम उपयोग करू शकणारा मेंदू आहे.मेंदूच्या विकासातून माणसाला भाषा घडवण्याची शक्ती प्राप्त झाली.पण भाषा अनुवांशिक नाही.ती आपण शिकतो.असे म्हणतात की,बादशहा अकबराने प्रयोग म्हणून काही तान्ह्या मुलांना मुक्या बहिया दायांकरवी वाढवले आणि बोलक्या माणसांचा संपर्क तोडळा.ही मुले कोणतीही भाषा न बोलता हावभावांनी आणि हातवान्यांनी इशारे करू लागली.तेव्हा स्वरयंत्रे नि मेंदू यांच्यामुळे भाषा जन्माला आली आणि परस्पर संपर्कातून ती पिढ्यान् पिढ्या चालत राहिली.पण हाडांच्या सांगाड्यांसारखे भाषेचे सांगाडे भूगर्भात सापडत नसल्यामुळे तिचा उगम शोधता आलेला नाही.आपण 'इतके कोटी वर्षां-पूर्वी अमके प्राणी होते' अशा गप्पा कशाच्या जोरावर मारतो तर काही किरणो- त्सर्गी पदार्थाच्या गुणधर्माचा वापर करून.न जाणो लक्षावधी वर्षांपूर्वी निर्माण झालेले ध्वनी,त्यांच्या अतिसूक्ष्म लहरी, अंतराळातून शोधून,पकडून वाढवून ऐकणे पुढे शक्य होईल.मग कदाचित भाषेच्या जन्माचे कोडे सुटेल.( इतका जुना नाही तरी सुमारे पंचवीस हजार वर्षांपूर्वीचा काही पुरावा सापडतो.दक्षिण फ्रान्समधे गुहांच्या भिंतीवर इतकी जुनी चित्रे दिसतात.ही काढणारा मानव आजच्यासारखी भाषा वापरत असावा,असे तज्ज्ञांचे मत आहे.)
 भाषेचा प्रश्न बाजूला ठेवला तर संस्कृतीच्या इतर कोणत्या अंगांच्या विकासाचा उलगडा उत्क्रांतिवादातून होतो? मुळात संस्कृती म्हणजे काय ? आपल्या कामापुरती आपण संस्कृतीची 'माणसांच्या सामूहिक जीवनाचे भौतिक,सामाजिक आणि 'मानसिक पैलू' अशी व्याख्या करूया.यात साधनसंपत्तीचे उत्पादन आणि विनियोग, ज्ञान आणि तंत्रज्ञान, शासनयंत्रणा आणि अर्थरचना, न्यायसंस्था, धर्म, निरनिराळ्या रूढी, समजुती,कला अशा अनेक गोष्टी सामावल्या आहेत.संस्कृती ही संकल्पना अवघड आहे.तिच्या कोणत्याही व्याख्येमधे अव्याप्ती किंवा अतिव्याप्तीचे दोष शिरण्याची फार शक्यता असते.वरील व्याख्येमधून ती कल्पना ढोबळपणे मांडली गेली तरी पुरे.

 संस्कृतीचा एखादा पैलू त्या मानवसमूहाचे मोठ्या प्रमाणावर अहित करणारा असेल तर काय होईल ? त्या गटाची शक्ती क्षीण होईल.तो गट आजूबाजूच्या

१०

नराचा नारायण / १४५