पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निर्माण झाले. मग पाणी आणि जमीन दोन्हीवर वावरणारे जीव घडले. त्यानंतर मानव आणि प्राणी यांच्या अधेमधे असा नरसिंह अवतार घडला आणि शेवटी मानव अस्तित्वात आला.
 बायबलमध्ये जेनेसिस या भागात सांगितले आहे की, सुमारे ६००० वर्षांपूर्वी ईश्वराने सहा दिवसांत सर्व विश्व निर्माण केले. पृथ्वी, प्रकाश, अंधार, प्राणी, वनस्पती आणि शेवटी, त्याच्या प्रतिमेमधून मानव. यानंतर थोडेबहुत प्रलय वगैरे आले, पण जीवसृष्टी एकदा घडली ती घडली. यानंतर प्राण्यांमधे फेरफार झाले नाहीत. होणार नाहीत.
 पृथ्वी, सूर्यमंडल आणि एकंदर विश्व कसे घडले असावे याबद्दल खगोलशास्त्रज्ञांमध्ये अजूनही एकवाक्यता नाही. पण पृथ्वीवर आज दिसणारी जीवसृष्टी कशी विकसित झाली असावी याबद्दल मात्र वैज्ञानिकांमध्ये बव्हंशी एकमत आहे. जीवसृष्टीची घडण समजावून सांगणारा सिद्धांत म्हणजेच चार्लस् डार्विनने सांगितलेला उत्क्रांतिवाद.

 चार्लस डार्बिन हा व्हिक्टोरियन इंग्लंडमधील एका श्रीमंत कुटुंबातला धाकटा मुलगा. घरात दोन पिढ्यांची यशस्वी वैद्यकी, आजोळ उत्तम चिनी मातीची भांडी बनवणाऱ्या गर्भश्रीमंत कारखानदार, वेजवूड कुटुंबामध्ये. डार्विन शाळेमधे मुळीच चमकला नाही. पुढे वडिलांनी वैद्यकी शिकण्याकरता त्याला एडिंबरोला पाठवले. तिथूनही तो दोन वर्षांनी हात हलवत परत आला. मग त्याला केंब्रिजला शिकायले घातले, तिथे मात्र तो उत्तीर्ण झाला. पण आपल्या अभ्यासापेक्षा भटकंती, दगडधोंडे गोळा करणे, रसायने एकमेकात घालून काय घडतेय ते पाहणे, बेडुक पकडणे यातच त्याचे लक्ष असे. त्यावेळी ऑक्स्फर्ड, केंब्रिजमध्ये विज्ञान शिकण्याची फारशी सोय नव्हती. लॅटिन, गणित, इंग्रजी, धर्म, कायदा असलेच विषय शिकायचे. पण डिग्री मिळवून घरी आल्यानंतर डार्विनकडे एक सुवर्णसंधी चालून आली. 'बीगल' हे आरमारी जहाज दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्याची पाहणी करून नकाशे बनवण्याच्या कामावर जाणार होते. बरोबर प्राणी आणि वनस्पती यांची पाहणी करणारा एक माणूस न्यायचा होता. पगार नाही. भटकंतीची आयती संधी एवढेच. प्रोफेसरांनी डार्विनच्या नावाची शिफारस केली. डार्विनने जाण्याची परवानगी मागितल्यावर वडील म्हणाले, की आयुष्यभर उनाडक्याच करणार आहेस का ?

२ / नराचा नारायण