पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/149

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लिहिता येत नाही. ही फक्त टाइप करते. (आता तर नुसता स्पर्श करते.. खुलजा सिम सिम असे जग झालेय त्यांचे!) कट, पेस्ट, सेंड, फॉरवर्ड, लाइक, गो, क्विट भाषा, आदेश, मौन व्यक्त करणारी. यांचे जगच वेगळे. त्यांची विचार पद्धती वेगळी. उपजत एकाग्र, चंचल, गतिमय. 'ज्यांचा मेंदू वेगळ्या जगात वाढतो, ते जगास नव्या रचनेकडे नेत असतात,' असे डॉ. ब्रूस बेरीचे म्हणणे आहे. ते या डिजिटल नेटिव्ह पिढीवर संशोधन करत आहेत.
 तिकडे शिक्षक या नव्या नेट वर्किंग जगात अपुरे ठरत आहेत. संगणक, इंटरनेट पूर्व काळात जन्मलेले शिक्षक नव्या काळात डिजिटल इमिग्रंट ठरत आहेत. .... स्थानांतरित पक्षासारखे. जागतिकीकरणापूर्वी जन्मलेला आजचा शिक्षक. त्याचे वर्णन 'प्रि-इंटरनेट जनरेशन' असे केले जाते. संगणक क्रांतीपूर्वी जन्मलेला, व्यवसायात आलेला. हे शिक्षक बंद खोलीत शिकवणाऱ्या पिढीचा शेवटच शिलेदार ठरणार ही आता काळ्या दगडावरची रेघच म्हणा ना! नव्या तंत्रज्ञानाने एक नवे ज्ञानाचे क्षितिज खुले केलेय. नवा ज्ञानसमाज (Knowledge Society) उदयाला आलाय. ज्ञानाची नव प्रतिसृष्टी... आभासी जग (Virtual world) निर्माण केलेय. आता ऑनलाइन एज्युकेशनचा काळ आला आहे. इंटरनेटवर अभ्यासक्रम, घटक, घटक चाचण्या, परीक्षा कार्यक्रम, प्रमाणपत्रे सारे असते. तुम्हीच अभ्यास करायचा तुमच्या सवडीने. परीक्षा द्यायची तुमच्या मर्जीप्रमाणे. विषय निवडायचे स्वातंत्र्य, शिक्षक पण आभासीच. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यास अमूर्तपणे मदत करत राहतो. तो सूतोवाच करतो, सूत देतो, स्वर्गाला तुम्हीच जायचे तुमच्या बुद्धी, क्षमता कुवतीनुसार. नवे शिक्षण खरेच 'अपना हाथ जगन्नाथ' झालेय! त्याने शिक्षकाला म्हणजे मानवी शिक्षकाला (Human Teacher) हद्दपार, रिटायर्ड करायचा चंगच बांधलाय. आता नव्या शिक्षणात मानवी शिक्षकाचे कार्य काय तर प्रेरणा देणे, प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांचे सामाजीकरण करणे, मूल्य शिकवणे, संवेदना वृद्धिंगत करणे, जिज्ञासा निर्माण करणे, कारण ते या आभासी साधनांकडून (अजून तरी) होत नाही. उद्याचे कुणी सांगावे? असे जग म्हणू लागले आहे की, नव्या शिक्षकाची भूमिका बालमानसशास्त्रज्ञाची, समुपदेशकाची (Counselor) राहिली आहे. मी उरलो नावापुरता ठरण्याची

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१४८