पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/16

हे पान प्रमाणित केलेले आहे.

कात टाकण्याशिवाय पर्याय नाही...


 निवृत्तीमुळे माझे प्रत्यक्ष शिकवणे बंद झाल्यामुळे असेल कदाचित, पण शिक्षणात येऊ घातलेल्या नव बदलांबद्दल माझ्या मनात विलक्षण कुतूहल जागे झालेय. मी रोज इंटरनेटवर शिक्षणविषयक लेख, अहवाल वाचतो, स्लाईडस्, व्हिडिओ क्लिप्स पाहतो, भाषणे, चर्चा, परिसंवाद ऐकतो. त्यातून एक गोष्ट माझ्या पक्की ध्यानी आली आहे, ती ही की नजीकच्या भविष्यकाळात सर्वाधिक बदल जर कुठल्या क्षेत्रात होणार असतील तर ते क्षेत्र आहे शिक्षण.
 एक लाकडी घोडा, एक पाण्याचा पिंप, एक बाई/दाई आणि चांगली पाच-पन्नास चिल्ली-पिल्ली घेऊन १०x१० च्या खोलीत बालवाडी नामक कोंडवाडा चालवायचा काळ इतिहासजमा होणार. बालवाडी चांगली चार-पाच वर्ग, भरपूर खेळणी, मल्टिमिडिया, संगीत कक्ष, विश्रांती कक्ष, उपाहार गृह, जिम, मैदान, दहा-पंधरा शिक्षक आणि मुलं-मुली फार तर वीस-पंचवीस. बालवाडीत सिनेमा, टी.व्ही., व्हिडिओ गेम्स, असेल, नसेल पाटी-पेन्सिल. असेल टॅब, लॅपटॉप्स. मुलांनी रिकाम्या हाताने यायचं नि डोकं भरून परतायचं. आलेला मुलगा, मुलगी जाताना, शाळा सोडताना फुलपाखरू झालेला असेल. तो कल्पना चंचल, स्वप्नलक्ष्यी, रंगवेडा, निसर्गप्रेमी, खेळकर, खोडकर आणि किल्ले रचणारा अन् सर करणाराही असेल.
 तीच गोष्ट शाळेची. शाळा म्हणजे विद्यार्थी, शिक्षक, वर्ग, फळा, टेबल, खुर्ची, बेंच, कपाट नव्हे. शाळा असेल बहुरंगी, बहुढंगी. विषय मुलांच्या आवडी, कल, कला, वृत्तीनुसार ठरतील. सगळ्यांना एक युनिफॉर्म नाही, प्रत्येकाचे कपडे वेगळे, तसे विषयही. सर्वांना एकच अभ्यासक्रम, पुस्तक, गृहपाठ इतिहास जमा होईल. विषय बदललेले असतील, शिकवणं

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१५