पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/163

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संग्रहित (save) करतो, सुरक्षित ठेवतो. परत वापरतो. पुनर्वापरात आवश्यक तेवढे घेतो. बाकी सोडतो किंवा खोडतो. (Delete) करतो. नवज्ञान विस्तारात पर्यायांचा महापूर आला आहे. 'आंधळा मागतो एक आंतरजाल देतो हजारो' अशी स्थिती असल्याने निवडण्याच्या चोखंदळपणाला महत्त्व आले आहे. निवड तेच करू शकतात ज्यांना पर्यायांची पारख असते. यामुळे नवशिक्षकास नवे तंत्र हवे तसे नवे मंत्र ही. त्याचे वाचन 'वाचू आनंदे', 'लिहू नेटके', 'तोतोचान', 'प्रिय बाई', 'शाळाभेट', 'माझी काटे मुंढरीची शाळा', 'प्रज्वलित मने', 'शाळेपासून मुक्ती', 'परीक्षेला पर्याय काय?', 'प्राचार्य', इथपर्यंतच मर्यादित असून चालणार नाही. त्याला 'आशय' 'भिंतीबाहेरची शाळा' सारखी पुस्तके माहीत हवीत, पण शिक्षण प्रक्रियेच्या मूलभूत गाभ्यांचा अभ्यास समजावणारी पुस्तकेही माहीत हवी. उदाहरणच द्यायचे झाले तर आपण वाचनाचेच घेऊ. 'वाचन' या एकाच विषयावर मराठीत 'निबंधमाला' (विष्णुशास्त्री चिपळूणकर) यांच्यापासून 'जलद व प्रभावी वाचन' (अशोक इंगवले)यांच्या पर्यंतचे लेखन वाचले तर वाचनाचा प्रवास वर्णनापासून ते विज्ञानापर्यंत आलेला लक्षात येईल. एकट्या वाचन प्रकारांचा अभ्यास करू लागलो तर लक्षात येते की, वाचनाच्या किती परी असतात. वरवरचं वाचन, चाळणे, मौखिक, शांत, प्रकट, सूक्ष्म, स्थूल, भाषिक, सखोल विस्तृत इत्यादी. वाचकांचे प्रकारही अनेक भावनिक/भावनाशील, बौद्धिक, मनोरंजक, अनपेक्षित, विनोदी, अभ्यासू, परीक्षार्थी, संकीर्ण बहश्रुत, विघातक, विधायक इत्यादी. शिवाय वाचनाचा पट (canvas) असतो, तो विस्तारता येतो. वाचनाची गती असते, ती वाढवता येते. वाचन दोष असतात, तो दूर करता येतात. वाचनाच्या विविध शैली, आणि उद्दिष्टे असतात. वाचनाची शास्त्रोक्त पद्धत आहे. त्यात आसन, उजेड, अंतर, कोन, मुद्राक्षर आकार (Font size) कागद, अक्षररचना, इत्यादींचा अंतर्भाव असतो. वाचनाच्या खुर्चा (Reading Chairs) असे नुसते संगणकावर लिहा नि त्याची चित्रं (Images) पाहा.

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१६२