पान:ना. गोखले चरित्र.pdf/१००

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६८
गोखल्यांच्या माफीचे सुपरिणाम.

कोणाची नालस्ती करणार नाहीं. जें खरें दिसेल तेंच करील, आपली अब्रू याच्या हातांत सुरक्षित राहील. इंग्लंडमधील लोकांसही वाटलें कीं, या माणसाची सत्याकडे दृष्टि आहे. सत्य कठोर असले तरी हा डगमगणार नाहीं. जी गोष्ट इंग्लंडमध्ये त्यांस सत्य वाटली ती जाहीर करण्यास ते भ्याले नाहींत. परंतु ती गोष्ट खोटी ठरली हें जेव्हां त्यांस दिसलें तेव्हां माफी मागण्याच्या सत्यात्मक मार्गापासूनही ते विमुख झाले नाहींत, ते पुनः जेव्हां इंग्लंडास गेले तेव्हां हा सत्यवक्ता आहे अशी लोकांची समजूत असल्यामुळे त्यांच्या शब्दास वजन प्राप्त होई व त्यांच्या शब्दाचा विचार होई. हा फायदा लहानसान नाहीं. वाइटांतून हे चांगले बाहेर पडलें, आणि जास्त सावधगिरी ते शिकले. परंतु इंग्लंडमध्यें, येथील अधिकारीवर्गात आणि कांहीं मित्रमंडळींत जरी त्यांची वाहवा झाली तरी पुष्कळ वर्तमानपत्रांनीं त्यांस भ्याड, भित्रा, वगैरे विशेषणे दिली. देशाचा अपमान करणारा अशी त्यांची निंद्य वर्णने करण्यांत आली. पुण्यांतील मेळ्यांमधून त्यांची टर उडविण्यांत आली! आपले लोक इतके कसे कृतघ्न असें गोपाळरावांस वाटे. त्यांनी इंग्लंडमध्ये बजावलेल्या कामगिरीचा गौरवपर उल्लेख एकानेही न करतां त्यांनी सत्यासाठीं जी गोष्ट केली त्यामुळे त्यांच्यावर येवढा गहजब केला! परंतु मुक्ताबाईनें ज्ञानेश्वरांस सांगितलेलें 'संत जेणें व्हावें । जगबोलणे सोसावें,' हेंच वचन लाखाचें आहे. गोखल्यांनी निमुटपणे सर्व सहन केलें. आपल्या गुरूची शांत व गंभीर मूर्ति त्यांच्या समोर होतीच. 'आपलेच दांत आणि आपलेच ओठ'- लोक निंदा करताहेत, करोत. ही स्वजननिंदा गोखल्यांनी थोर मनानें सहन केली. मात्र ते म्हणत 'Forgive I must, forget I can not' त्यांच्या अंतःकरणांत निंदेचे शब्द कायमचे बसले! टीकेसंबंधी त्यांचें मन जात्याच अत्यंत मृदु. इंग्लंडमध्यें असतांना एकादा शिष्टाचार आपल्या हातून चुकू नये म्हणून त्यांची कोण धडपड! असल्या साध्यासुध्या शब्दानेही विव्हल होणारे कोमल अंतःकरणाचे गोखले या प्रचंड शरसंपातानें किती घायाळ झाले असतील बरें? कण्वाश्रमींचा कुरंग जसा दावानळांत होरपळून निघाला तद्वत् त्यांची स्थिति झाली. टिळकांमध्यें आणि गोखल्यांमध्ये हा मोठा फरक