नाहीं. १८६१ साली त्यांना पहिला मुलगा झाला. परंतु हे फूल जो चिंतेनें खंगलें नाहीं, काळजीनें काळवंडलें नाहीं तोंच काळानें परमेश्वरास नेऊन दिलें. कॉलरिज या प्रतिभावान् कवीनें असल्याच एका प्रसंगावर एकच श्लोक लिहिला आहे परंतु तो किती सुंदर व भावनापूर्ण आहे!
"Ere sin could blight or sorrow fade,
Death came with friendly care;
The opening bud to Heaven conveyed
And bade it blossom there."
गोखल्यांच्या हृदयास चरका बसला. पुढे १८९३ मध्ये शके १८१५ भाद्रपद शु. प्रतिपदेस त्यांची वडील मुलगी काशीबाई हिचा जन्म झाला. या मुलीबद्दल ते फार काळजी बाळगीत. मूल हिंडते फिरतें होईपर्यंत जास्त जपावें लागतें. खोकला, आंकडी, डबा इत्यादि रोगांना मुले फार बळी पडतात. घरी आले रे आले की मुलगी कशी आहे याची ते चवकशी करावयाचे. सर्व नीट कुशल आहे असें समजलें कीं, त्यांचा जीव खालीं पडावयाचा. परंतु एकदां काशी वर्षांची होत आहे, बोबडे शब्द बोलूं लागून आईबापांस सुखवीत आहे, चालूं लागून दुडदुड धांवून सर्वांस आनंद देणार, तो तिला कठिण दुखणें आलें. तो मुदतीचा ताप होता. घरांतल्या सर्व मंडळीच्या तोंडचें पाणी पळालें. मुलगी हातीं कशी लागते याविषयी सर्व माणसे चिंतातुर झाली. परंतु देवाने खैर केली. ईश्वरानें कठिण प्रसंग येऊ दिला नाहीं. काशीबाई बरी झाली. ती बरी होईपर्यंत गोखल्यांचें चित्त ठिकाणावर नव्हतें. ते क्षणक्षणां माडीवरून खाली यावयाचे, पहावयाचे व सुस्कारा टाकून माघारी जावयाचे पहिले अपत्य गेलेलें आणि दुसऱ्या मुलीवर तोच प्रसंग आलेला. या विचाराने आईबापांच्या हृदयाचें कसें पाणी पाणी होते याची कल्पना इतरांस काय होणार? मुलगी बरी झाल्यावर गोपाळरावांचा आनंद गगनांत मावेना. त्यांची दुसरी मुलगी गोदूबाई ही पहिल्यापासूनच अशक्त होती. ती गोखले निवर्तल्यावर फार दिवस जगली नाहीं. गोखल्यांची आई याच सुमारास म्हणजे ९३-९४ च्या वेळी हा लोक सोडून गेली. या माउलीची पतिनिष्ठा आम्ही प्रथमारंभीं सांगितलीच आहे. तें आपल्या
६ - गो. च.