पान:ना. गोखले चरित्र.pdf/१४५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११३
राष्ट्र-धुरंधर गोखले.

आनंदास पारावार रहात नाहीं. दुप्पट कार्य करण्यास त्यास हुशारी येते. उल्हास द्विगुणित होतो. तीच गोष्ट गोखल्यांसारख्या हळुवार मनाच्या लोकांची असते. आपल्या कामाची वाहवा होवो न होवो, तें लोकांस रुचो वा न रुचो, कार्य करीत रहावयाचे, अशा धमकीनें केवळ निःसंगतेनें काम करणारा एकादाच; जवळ जवळ नाहींच म्हटलें तरी चालेल, गोखले हे मुलाप्रमाणें होते. आपल्या कामगिरीचा गौरव झाला पाहून त्यांस गहिंवर आलेला होता. काशीसारख्या पुरातन काळापासून पवित्र झालेल्या नगरींत, जेथें विश्वंभराचें वास्तव्य, जेथें गंगेचा गंभीर प्रवाह, अशा पुण्यपावन ठिकाण, गोखल्यांसारखा तरुण, उत्साही व देहाची सुद्धां पर्वा न करितां देशकार्य करणारा पुढारी अध्यक्ष नेमण्यांत आला होता.
 परंतु यंदांच्या काँग्रेसचें काम फार बिकट होतें. राष्ट्रांत पूर्वीपासून दिसून येणारे मतभेद आतां अधिक स्पष्टपणे दिसूं लागले. बहिष्कार बंगाल प्रांतापुरता न ठेवतां सर्वराष्ट्रीय करावा, राजपुत्राच्या स्वागतावर बहिष्कार घालावा वगैरे प्रश्नांवर मोठीं रणें माजली. परंतु एकंदरीनें सर्व सुरळीत पार पडलें. गोखल्यांनीं फेरोजशहांस तारा केल्या, परंतु फेरोजशहा या सभेस हजर राहिले नाहींत. गोखल्यांस वाटत होतें कीं, या वेळेस फेरोजशहांसारखा वजनदार गृहस्थ आपणास सल्ला देण्यास असेल तर काम जास्त सुरळीत पार पडेल. परंतु तितकी विशेष भानगड झालीच नाहीं.
 गोखल्यांचे अध्यक्षपदावरून वाचण्यांत आलेले भाषण फारच सणसणीत होतें. आपल्या व्याख्यानाच्या आरंभी कर्झनशाहीची अवरंगजेबशाहीशी त्यांनी मार्मिक व यथार्थ तुलना केली. अवरंगजेब कर्तबगार होता, परंतु घमेंड व सर्वांचा संशय या दोन कारणांनी त्याची कारकीर्द सुखावह झाली नाहीं. खुद्द त्याच्या कारकिर्दीत बंडे वगैरे विशेष झालीं नाहींत, तरी त्याच्या पाठीमागें सर्वत्र बजबजपुरीच माजली. कर्झन गेले खरे परंतु त्यांच्यानंतर आलेल्या मिंटोसाहेबांच्या कारकिर्दीत अराजकतेला व्यक्त स्वरूप आलें. कर्झनच्या कारकिर्दीत मनांत बीजारोपण झालें, मिंटो साहेबांच्या कारकिर्दीत त्याचा रोपटा झाला. कर्झनचीं कृष्ण कृत्ये व त्यांचीं फळें
 ८- गो. च.