पान:ना. गोखले चरित्र.pdf/१५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देशप्रगतीच्या विविधांगांचे व मूलतत्त्वांचें सम्यग्ज्ञान व त्यांचा आचारात्मक अनुभव अजून आमच्या लोकांस चांगला आलेला नाहीं पण येत चाललेला आहे आणि म्हणूनच निर्णायक मत देण्यास अनुकूलसा काळही जवळ येत आहे असें वर सुचविण्यांत आलें आहे.
 रा. साने यांचें प्रस्तुत चरित्र हें वरील दिशेनें वारा वाहूं लागल्याचे एक चिन्ह आहे असे समजण्यास चिंता नाहीं. रा. साने हे टिळक-गोखल्यांचे पिढींत वाढले नसून अगदीं उदयोन्मुख पिढीतले एक होतकरू पदवीधर आहेत. टिळकांना व कदाचित् गोखल्यांना त्यांनीं त्यांच्या कारकीर्दीच्या अखेरीअखेरीला पाहिलें असेल. आज या थोर पुरुषांशीं समागम करून घेण्यास त्या पुरुषांची भाषणे, लेख व कृती व त्यांचेविषयीं इतरांनी व्यक्त केलेले विचार व प्रगट केलेली माहिती यांवरच अवलंबून राहून रा. साने यांस आपले मत लिहावयास पाहिजे. ही मर्यादा संभाळून निःपक्षपाती दृष्टीने रा. साने यांनीं आपलें बिकट काम केलें आहे. त्यांची त्रयस्थाची भूमिका आहे. आणि अद्यापि जरी या भूमिकेस पूर्णावकाश झालेला दिसत नाहीं तरी त्या बाजूची पाउलवाट झालेली आहे आणि रा. साने त्याच वाटेने आपली चाल चालले आहेत.
 वरील भूमिकाविशेषाचा मुद्दा सोडला तरीहि रा. साने यांचें प्रस्तुत चरित्र आपणांस प्रियच होईल. कारण रा. साने यांची भाषाशैली प्रसंशनीय आहे. तिच्यांत तारुण्याचा आवेश जसा चमकतो तसाच तारुण्यांतील निर्मळपणाही लकाकत आहे. इंग्रजी, मराठी व संस्कृत या तिन्ही वाङ्मयांशीं त्यांचा जो निकट परिचय आहे त्याचेही प्रतिबिंब ग्रंथांत जागजागी पडलेलें आपणांस दिसून आनंद होतो. देशप्रीति आणि देशसेवार्ति यांचे पाझर रा. साने यांच्या ग्रंथांत जागोजाग फुटलेले दिसतात त्यामुळें प्रस्तुत ग्रंथ फार मधुर झाला आहे.
 थोर पुरुषांच्या मुख्य दोन कोटि कल्पितां येतात. एक विचारस्रष्ट्यांची व दुसरी कार्यकर्त्यांची. श्रीकृष्ण, शंकराचार्य, कान्ट, स्पेन्सर, रूसो, बुद्ध, माझिनी, रामदास हे पहिल्या कोटींत येतील आणि अर्जुन, शिवाजी, नेपोलियन, वाशिंग्टन्, कव्हूर वगैरे दुसऱ्या कोटींत पडतील, विचारस्रष्ट्यांचा मागोवा घेत कार्यकर्ते जर गेले तर होणारे परिणाम फार विशाल