पान:ना. गोखले चरित्र.pdf/१६१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२९
बहिष्काराच्या सर्वराष्ट्रीयत्वाचा प्रश्न.

कांहीं करणार नाहीं, आणि इतर सर्व अवयव मात्र निमूटपणें आपआपल कामे करूं लागतील तर शेवटी हातासच ताळ्यावर- मूळपदावर यावे लागेल. सर्वांनी जोराचा प्रतिकार केला पाहिजे. इतर प्रांतांच्या फुकाच्या- आणि मोठ्या मुष्किलीने मिळविलेल्या- शाब्दिक सहानुभूतीची किंमत कवडीइतकीही नाहीं असें आमचें प्रामाणिक मत आहे, मग इतरांस कसेंही वाटो. जेव्हां बहिष्कार सर्वराष्ट्रीय आहे असें राष्ट्रीय सभेत कांहीं मंडळी बोलूं लागली तेव्हां गोखल्यांस खालीं बसवेना. ते ताडकन् उभे राहिले आणि म्हणाले 'बहिष्कार हा सर्वराष्ट्रीय नाहीं. जो असें म्हणत असेल तो तें स्वतःच्या वैयक्तिक जबाबदारीवर म्हणत असला पाहिजे. काँग्रेसनें असें नमूद केलेलें नाहीं.' काँग्रेसनें या प्रश्नावर मूक वृत्ति स्वीकारली. बंगालमधील चळवळ न्याय्य आहे येवढेच कलकत्त्याच्या राष्ट्रीय सभेचें म्हणणें पडलें.
 यानंतरची १९०७ सालची सभा लजपतराय लाहोरला बोलावीत होते. परंतु नागपूर हें ठिकाण सोइस्कर पाहून तेच कायम करण्यांत आलें. आणि पुढील वर्षाचे अध्यक्ष राशबिहारी घोष हे असावे असें पुढारी मंडळीनें ठरवून आपसांत दिलजमाई केली. आपआपल्या प्रांतिक परिषदांतून कलकत्त्याचे ठराव हाणून पाडण्याचेंही त्यांनी ठरवून टाकले. १९०६ च्या राष्ट्रीय सभेंत राष्ट्रीय पक्षाचें बळ चांगलेच दिसून आले. पुढील वर्षी राष्ट्रीय पक्षाचें बळ कमी करून काँग्रेस आपल्याच हातांत ठेवावयाची व तदनुसार वर्षभर सारखे प्रयत्न करावयाचे असे प्रागतिक पक्षानें ठरवून टाकलें.

गोखल्यांचा देशभर व्याख्यानांचा दौरा.

 गोखल्यांनी जेव्हां हें नवीन पक्षाचें बळ पाहिलें तेव्हां कॉंग्रेसला सरकारची सहानुभूति मिळणार नाहीं अशी भीति त्यांस वाटू लागली. त्यांना मोर्ले साहेबांनी असे निक्षून सांगितलें होतें कीं जर हिंदुस्तानांतील लोक भलतीकडेच वाहवत जाऊन सरकारवर शिव्याशापांचा भडिमार चालू ठेवतील तर हिंदुस्तानास कोणतेही हक्क मिळणे शक्य नाहीं. लॉर्ड मिंटो यांचा पुतळा अनावृत करावयाच्या वेळेस लॉर्ड हार्डिज यांनीही याच प्रकारचे
 ९ - गो. च.