पान:ना. गोखले चरित्र.pdf/१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गुण आपल्या अंगी बाणविण्याचा जर आमच्या देशांतील तरुण लोक प्रयत्न करतील तरच त्यांचें चरित्र लिहिल्याचे किंवा वाचल्याचे सार्थक झालें असें होणार आहे. गोपाळरावांचे हे गुण येथे थोडक्यांत वर्णितों:-
 (१) कष्टाळूपणा- सर्व थोरपणाचें मुख्य कारण कष्टाळूपणा हें होय. समर्थांनी जागोजागी सांगितले आहे की "रूप लावण्य अभ्यासितां नये । सहज गुणासि न चले उपायें । कांहीं तरी धरावी सोये । आगांतुक गुणांची ॥" द्रष्टेपणाचा डोळा जिनें फुटतो ती प्रतिभा, ही सहजगुणांतली आहे. तें 'ईश्वरी देणें' आहे. पण कष्ट, दीर्घोद्योग हा मनुष्याचें हातांतला आहे. उद्योग किंवा प्रयत्न हा प्रसंग सहजगुणापेक्षांहि कमावला तर प्रभावी ठरतो, इतकें याचे महत्त्व आहे. यासाठीच समर्थांनी म्हटले आहे 'कष्टेंवीण फळ नाहीं । कष्टेंवीण राज्य नाहीं । केल्याविण होत नाहीं । साध्य जनीं ॥' हा कष्टाचा आगांतुक गुण गोपाळरावांनी उत्तम प्रकारें कमावून प्रतिभादि सहजगुणांची उणीव भरून काढिली. या गुणाचे बळावर त्यांनी कौन्सिलांतले आपले प्रतिपक्षी चीत केले. इंग्रजी भाषा उणी पडली तर आम्हां नेटिवांना हंसतात काय? फांकडे इंग्रजी बोलणारे म्हणून आपण लौकिक संपादणार अशी ईर्ष्या धरून त्यांनी कष्ट केले. आंकडेशास्त्रांतली माहिती कच्ची असली तर आमचा सरकारी सभासद उपहास करतात काय तर आंकडे पुस्तकांच्या समुद्रांत बुड्या मारमारून व तारवें हांकहांकून ते त्यांतील सराईत नावाडीच बनले. असे पडतील ते कष्ट त्यांनी केले. नसते केले तर फर्ग्युसन कॉलेजांतील शिदोरीवर अवलंबून एवढा पल्ला त्यांच्यानें खचित गांठवला जाता ना! पण कष्टाचे बळावर त्यांनी 'असाध्य तें साध्य' करून घेतलें.
 (२) 'नेमस्तपणा'- हाहि एक दुसरा महत्त्वाचा गुण गोपाळरावांचे अंगीं होता. आपल्या सर्व भावनांचे लगाम विवेकाचे हाती देऊन आपला जीवितरथ चालविण्याची सावधगिरी त्यांनी बाळगिली, त्यामुळें त्याचें आयुष्य इतकें यशस्वी झालें, प्रत्यक्ष व्यवहारांत काम करतांना कल्पनांना मुरड घालावी लागते. कल्पकता हा एक सहजगुण आहे व तो श्रेष्ठ