काम झाल्यानंतर गोपाळरावांस पुनः इंग्लंडमध्ये जावें लागलें. खुद्द लॉर्ड मिंटो यांनी गोपाळरावांस इंग्लंडमध्ये जाऊन मोर्ले साहेबांस सहाय्य करा असे सुचविले. हिंदुस्तानांतील असंतोषामुळे व अत्याचारांमुळे सुधारणा कदाचित् मिळणार नाहींत या विचाराने तो प्रसंग टाळण्यासाठी गोखले विलायतेस गेले. मोर्ले साहेबांपुढे हिंदुस्तानची बाजू शक्य तितक्या जोराने त्यांनी पुढे मांडली. हिंदुस्तानांतील लोकांचा ब्रिटिशांवरचा विश्वास उडत चालला आहे, अत्याचारांस ऊत येईल; तर वेळीच सावध राहून त्या लोकांचा उडणारा विश्वास पुनः संपादन करा. एकदां मन तुटले की ब्रह्मदेवासही सांधता येणे अशक्य आहे. एकमेकांची मनें पुनः कधीही संयुक्त होणार नाहींत अशा तऱ्हेंनें तोडूं नका. आणि मनें तोडावयाची नसतील तर हिंदुस्तानास अधिक हक्क राज्यकारभारांत देणें हेच रास्त व प्रसंगोचित आहे.
गोखले इंग्लंडमध्ये असतां इकडे टिळकांस सहा वर्षे शिक्षा झाली. उतारवयांत झालेली ही भयंकर शिक्षा पाहून नेमस्त लोकांनाही खेद व उद्विग्नता हिंदुस्तानांत प्रगट केली. इंग्लंडमध्ये या शिक्षेबद्दल निषेधप्रदर्शक सभा भरविण्यांत यावयाची होती. गोखले त्या सभेस हजर राहिले नाहींत येवढंच नव्हे तर चकार शब्दही कोठे बोलले नाहीत. आपण टिळकांच्या शिक्षेविरुद्ध जर कांहीं बोललो तर आपल्या शिष्टाईस बाध येईल असे त्यांस वाटले असावे. टिळकपक्षाशी आपला संबंध नाहीं असे दाखवून दिले पाहिजे याच हेतूने गोखल्यांनी या वेळीं मौनवत स्वीकारले असें दिसतें. कांहीं असो; सहानुभूतीचा एक शब्दही गोखल्यांकडून टिळकांस मिळाला नाहीं हें खरें. टिळकांविषयी केवढी ही अनुदारता? देशासाठी आपण सुधारणा मागत आहों त्यांस आपणाकडून टिळकांविषयीं उदारता दर्शित झाली तर कदाचित खो बसेल, हा हेतु असो किंवा व्यक्तिगतच कांही वाटत असेल कोणास माहीत, पण गोखल्यांनी आपल्या दुसऱ्या देशसेवकाबद्दल उदारता दर्शविण्याची संधि गमावली असे म्हटल्याविना राहवत नाही. मोर्ले साहेबांस गोपाळरावांनी ज्या सूचना केल्या त्या खालीलप्रमाणे होत्या. कौन्सिलांत लोकनियुक्त प्रतिनिधींची वाढ करावी, गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळांत एतद्देशीय प्रतिनिधि असावे, स्टेटसेक्रेटरीच्या कौंसिलमध्येही एक एतद्देशीय प्रतिनिधि असावा. या गोष्टी फार अगत्याच्या
पान:ना. गोखले चरित्र.pdf/२०४
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४
इंग्लंडची दुसरी सफर.