पान:ना. गोखले चरित्र.pdf/२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४

कार्याविषर्थी थोडा विचार केल्याशिवाय ही प्रस्तावना पुरी करतां येत नाहीं. गोपाळराव गोखले यांच्या सर्व कार्यांत आमच्या मतें भारतसेवक समाजाची स्थापना ही सर्वात श्रेष्ठ कामगिरी होय. अशी संस्था अखिल भारतवर्षात दुसरी नाहीं. 'पोलिटिकल संन्यासी' निर्माण करावे म्हणून ही संघटना गोपाळरावांनीं केली. यासाठी संथपणे खपून व आपले सर्व वजन खर्चून त्यांनीं निधि जमविला आणि लायोला किंवा रामदास यांचेप्रमाणे आद्य सभासद म्हणून सर्व व्यवस्था स्वतः केली. राजकीय व आर्थिक विषयांवरील सर्वोत्कृष्ट ग्रंथसंग्रह येथे करण्यास त्यानीं आरंभ केला होता. आणि ते जर सुदैवाने आणखी बरीच वर्षे जगते तर ही संस्था अत्यंत कार्यकारी करून तिचें नांव जगाचे इतिहासांत बहुत काळ राहील असा तिचा विकास त्यांनी केला असता. पुण्यासारख्या ठिकाणी इंपीरिअल लायब्ररी सारखें ग्रंथालय स्थापावे हा विचार गोखले यांस मानवला होता आणि आज पुण्यास विद्यापीठ स्थापण्याच्या मागणीस त्यांजकडून खात्रीने चांगलीच मदत झाली असती. त्यांच्या मागें त्यांची जी उपदिष्ट मंडळी हल्लीं आहे त्यांजवर हा बोजा आहे आणि त्यांनी भोवतालची परिस्थिति कशी झपाट्याने बदलत आहे व या वावटळीत आपण खरोखरच किती पुढे गेलों आहांत याचा नक्की अंदाज करून जर आपली हालचाल ठेविली नाहीं तर ते मागें पडतील व गोपाळरावांचे कार्य त्या मानानें अपूर्णच राहील. खुद्द गोपाळरावांचे सुद्धा असें झालें होतें कीं त्यांचे तोंड सरकाराकडे वळलेलें असे म्हणजे सोसायटी सोडल्यापासून पुढें तें प्रजापक्षातर्फे सरकाराशीं वकिली करण्यासाठीं सरकार दरबारींच बरेचसे राहिले, तरी पण त्यांचा आत्मा स्वलोकांत वावरत होता. आणि म्हणूनच त्यांनी भारत-सेवक-समाजाची स्थापना केली आणि म्हणूनच दहांपैकी नऊ हिस्से काम स्वदेशांतच केलें पाहिजे असे त्यांनीं बजावून सांगितलें. खुद्द लोकांकडे तोंड वळवून त्यांना आपले विचार गोपाळरावांनी क्वचित् वेळींच कळविले. हिंदुस्थानाविषयीं विलायतेंत त्यांनी जितकी व्याख्यानें दिलीं तितकीं हिंस्दुथानांत दिलीं नाहींत. येथे बरेंच बोलणें ते कौन्सिलांतून करीत. लोकमत तयार करण्याची अवघड कामगिरी त्यांस कितपत साधली असती हा प्रश्न मनोरंजक आहे. लोकमत तयार करण्याचे