पान:ना. गोखले चरित्र.pdf/२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५

मुख्य साधन म्हणजे लोकभाषा. जोवर सुशिक्षित मंडळी ही मूकजनतेचें प्रतिनिधित्व बिनबोभाट करीत असे व तो त्यांचा हक्क श्रद्धाळूपणे इतर जनतेनें मानला होता तोंवर इंग्रजीतून चालणाऱ्या कांग्रेसादि सभा इंग्रजीतून पडणारे वक्तृत्वाचे पाऊस उपयोगी पडले. परंतु जशी जागृति झाली, जसा गोपाळरावांसारख्यांनीं प्राथमिक शिक्षणाचा टाहो फोडला आणि टिळकांसारख्यांनीं केसरीगर्जनांनी देश दणाणून सोडला तसा लोकभाषेचा व्यापार आनवार वाढला. आतां भविष्यकाळ एकट्या इंग्रजीचा नाहीं. इंग्रजीनें इंग्रज काबीज करावयाचा तर लोकभाषांनी लोक आंवळावयाची कामगिरी यापुढे करावी लागणार. गोपाळरावांनी लोकभाषेचें प्रभावी हत्यार जर वापरले असतें तर त्यांची स्थिति आज फार निराळी असती. साउथआफ्रिकेतून आल्यावर आणि कचित् पूर्वीही गोपाळरावांनी तो प्रयोग करून पाहिला होता आणि त्यांच्या नैसर्गिक सामर्थ्यामुळे जरी तो अयशस्वी होत नसे तरी इंग्रजी- इतका तो यशस्वी झाला असेंहि त्यांस वाटत नसावें. गोपाळरावांचे गुरु या प्रयोगांतही पंडित होते. परंतु हा प्रयोग जोराने चालविला असता म्हणजे श्रीशिवाजी उत्सवासारख्या लोकप्रिय परंतु नाजूक प्रकरणांची गोपाळरावांना अडचण उत्पन्न झाली असती! असो. गोपाळरावांचे काळीं नवयुगाचा उदय होत होता. तेथूनही बरीच मजल आपण आज पुढे चालून गेलो आहों. अशा वेळीं गोपाळरावांचा आपणांस अत्यंत उपयोग झाला असता परंतु आतां आपणां सर्वांवर- केवळ सांप्रदायिकांवरच नव्हे- तो भार आहे. रानडे, चिपळोणकर, आगरकर, टिळक, गोखले- प्रभृति लोकहिताचे 'जागली' आपणांत झाले. त्यांची आठवण ठेवून, त्यांचे गुण घेऊन व उपकार आठवून तोच भार आपण पुढिलांवर वाढवून सोपविला पाहिजे.

फाल्गुन शु. ५, १८४६, पुणे.   दत्तो वामन पोतदार.