पान:ना. गोखले चरित्र.pdf/२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७

उद्योगाने उत्कर्षाच्या किती उंचीवर जाऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण जर कोणतें असेल तर तें गोखले यांचेंच एक आहे. कोणी म्हणतात गोखल्यांच्या आंगीं असामान्य बुद्धिमत्ता नव्हती. कोणी दुसरें एकादें न्यून दाखवून त्यांची महति कमी करता आल्यास पहातात. पण हीं न्यूनेंच गोखल्यांच्या चारित्र्याचें महत्व सिद्ध करणारी आहेत हें निंदकांच्या ध्यानांत राहत नाहीं. सामान्य बुद्धिमत्तेचे गोखले केवळ अविश्रांत उद्योगाच्या जोरावर असामान्य बुद्धिमंतांना कर्तबगारीनें थक्क करूं लागले, ही गोष्ट स्फूर्तिदायक नाहीं असें कोण म्हणेल? निरलस यत्नाच्या बळाने सामान्यत्वाची सरहद्द ओलांडून ज्या पुरुषानें असामान्यत्वाच्या क्षेत्रांतलें अत्युच्च स्थान पादाक्रांत केलें, त्याचा कित्ता गिरवावा अशी प्रेरणा कोणाला होणार नाहीं? अलौकिक बुद्धिमत्ता, विख्यात कुळ, अपार धनसंचय ही सुद्धां मोठेपणाला नेऊन पोचविणारी साधने आहेत. परंतु तीं दैवायत्त असल्यामुळे ज्यांना तीं जन्मतः प्राप्त झाली असतील, त्याचें चरित्र अनुकरणाच्या दृष्टीनें आटोक्याबाहेरचें वाटल्यास नवल नाहीं. गोखल्यांचें चरित्राची मातब्बरी या दृष्टीनें विशेष आहे. देशहिताची तळमळ असल्यास सामान्य बुद्धि, दारिद्र्य वगैरे विघ्नें माणसाच्या कर्तृत्वाला बाधा करूं शकत नाहींत, हें गोखल्यांच्या चरित्राचें रहस्य आहे. त्या रहस्याचा तरुण जनतेच्या मनावर ठसा उत्पन्न करणारे जेवढे वाङ्मय उत्पन्न होईल तेवढे थोडेच ठरेल.
 गोखल्यांचें चरित्र १८६६ पासून १९१५ पर्यंतच्या म्हणजे ४९ वर्षांच्या कायमर्यादेत पसरलेलें होतें. परंतु हा काळ महाराष्ट्राच्या व भारतवर्षाच्या इतिहासांत अत्यंत महत्त्वाचा गणावा लागतो. याच काळांत महाराष्ट्राच्या राजकीय जीविताला वळण लागलें. ब्रिटिशांचे हिंदुस्तानांतले राज्यकर्तृत्त्व विजय आणि जिंकलेल्या प्रदेशांचा बंदोबस्त या दोन अवस्थांतून सुटून पुनर्घटनेच्या अवस्थेत १८६१ साली शिरलें. १८५७ च्या बंडानें इंग्रजी राज्यकर्तृत्त्वाची मिठी किती घट्ट बसली आहे, याचा साऱ्या दुनियेला अनुभव आला. पण त्याच वेळीं राज्यकर्त्यांनाही समजलें कीं, हिंदी लोकमताची विचारपूस करून आपलें प्रभुत्व गाजविण्याची वेळ आली आहे. १८६१ मध्यें कौन्सिले अस्ति