पान:ना. गोखले चरित्र.pdf/२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८

त्वांत आणून इंग्रजांनीं पुनर्घटनेला प्रारंभ केला. यानंतर पांच वर्षांन गोखल्यांचा जन्म होऊन हिंदी लोकमत काँग्रेसच्या रूपाने एकवटून नवीन नवीन आकांक्षा व्यक्त करूं लागलें. त्याच वेळीं गोखले यांनी विद्यार्जन संपवून स्वार्थत्यागपूर्वक विद्यादान करावयास लावणाऱ्या सार्वजनिक कार्यांत आपले पाऊल टाकले. नंतर हळू हळू सुधारकाचे संपादक, सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे संपादक व सभेचे चिटणीस, प्रांतिक परिषदेचे चिटणीस, काँग्रेसचे एक प्रतिनिधि अशी निरनिराळ्या कार्यांच्या परंपरेनें त्यांनीं लोकसेवेचा मार्ग चोखाळण्यास आरंभ केला. वरच्यासारख्या बाहेरच्या स्वयंप्रेरणेने स्वीकारलेल्या कामांचा व्याप वाटत असतां त्यांनी ज्या शिक्षणसंस्थेला आयुष्याच्या सुरुवातीस सर्वस्व अर्पण करण्याची दीक्षा घेतली होती, त्या संस्थेच्या कामाचाही बोजा वाढत होता. हीं सर्व कामे त्यांनी एकमेकांचा विरोध होऊ न देतां सारख्याच उत्साहानें, आस्थेनें आणि कळकळीने चालविलीं. १८९७ साली त्यांची उमेदवारी संपून त्यांचे नांव होतकरू लोकनायक या नात्यानें मुख्य मुख्य पुढाऱ्यांबरोबर गोंवलें जाऊं लागलें. मध्यंतरीं वर्ष सवा वर्ष लोकापवादामुळें त्यांवें उज्वल कर्तृत्त्व अस्तप्राय दिसत होतें. परंतु ही स्थिति पालटून १८९९ नंतर त्यांची लोकसेवा डोळे दिपवून सोडण्यासारख्या प्रखरतेनें चमकू लागली व मग १९१५ पर्यंत तिच्या विलक्षण तेजस्वितेमुळे कोणत्याही अपवादाला डोके वर काढतां आलें नाहीं. असें गोखल्यांच्या चरित्राचें स्थूल स्वरूप आहे. त्यांनी आपली कर्तबगारी प्रामुख्याने एकट्या राजकीय विषयाला वाहिली असल्यानें सकृद्दर्शनीं त्यांचे चरित्र बिनगुंतागुंतीचे व एकतंत्री वाटते. पण त्यांच्या कार्याचें समग्र व यथोचित आकलन होण्यासाठी- पृथक्करण करूं लागलें कीं, त्याची बहुविधता ध्यानांत आल्याशिवाय रहात नाहीं. त्यांच्या कार्याची बहुविधता शेवटपर्यंत कायम होती. पण प्रत्येक महापुरुषाच्या पूर्ववयांतल्या कामगिरीला विशेष महत्त्व असतें, त्याच्या आयुष्यक्रमाला वळण लागून तें स्थिर होईपर्यंतच्या काळांतील कामगिरीचा इतिहास अधिक बोधप्रद समजला जातो. गोखल्यांच्या आयुष्यांतलीं, या दृष्टीनें पाहिल्यास, १८८७ ते १८९७ हीं दहा वर्षे अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यांचं राज