पान:ना. गोखले चरित्र.pdf/२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९

कीय ध्येय याच वर्षांत निश्चित झालें. सदर काळांत त्यांची हिंदी राजकारणाच्या भिन्न भिन्न अंगांसंबंधीं जीं मतें बनलीं, त्यांचाच त्यांनी १९०० पासून पुढील पंधरा वर्षांत जोरानें पुरस्कार केला व त्यांतलीं कांहीं सफळ करून दाखविलीं. ते प्रोफेसर होते, सुधारकाचे व सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे संपादक होते, काँग्रेसमधले व प्रांतिक परिषदेतले एक वक्ते होते वगैरे सामान्य गोष्टी सर्वांच्या परिचयाच्या आहेत; पण त्यांनी कोणती मतें प्रतिपादन केली, त्यांमध्ये व पुढच्या मतांमध्ये अंतर पडलें कां सादृश्य कायम होतें, इत्यादि मुद्दयांचा तपशीलवार उहापोह केल्याखेरीज त्यांच्या लोकसेवेचे वैशिष्ट्य लक्षांत येणें शक्य नाहीं. प्रस्तुत मुद्दयांचा अभ्यास करण्याचीं साधनें थोडीं दुर्मिळ आहेत व तीं मिळविण्याचा उद्योग न केल्यामुळें जो दोष स्वाभाविकपणें उत्पन्न होतो तो दोष या पुस्तकांत आहे.
 गोखल्यांचा उदय झाला तेव्हांच महाराष्ट्रांत टिळकांचा उदय झाला. परंतु दुर्दैवामुळे या दोघांमध्ये तीव्र मतविरोध उत्पन्न होऊन तो शेवट पर्यंत अखंड टिकला. या कारणामुळे एकाच्या चरित्राचा विचार करतांना दुसऱ्याच्या चरित्राचा विचार केल्याखेरीज गत्यंतर रहात नाहीं. त्यांपैकीं टिळक हे अत्यंत लोकप्रिय, अर्थात त्यांच्या बाजूनें कसलीही गोष्ट पुढें आली तरी तिचा चटकन् लोकांत आदर होतो. गोखल्यांना लोकप्रियता कधींच लाभली नाहीं. याचा परिणाम त्यांच्याविषयी लोकांत आढळणाऱ्या अनेक अवास्तव दुष्ट ग्रहांमध्ये दिसून येतो. गोखल्यांविषयी बारीकसारीक गैरसमज तर पुष्कळच आहेत, पण अर्वाचीन हिंदी राजकारणातले कित्येक प्रसिद्ध प्रसंग असे आहेत कीं, त्यांची पहाणी करतांना हटकून बुद्धिभेद होतो. १८९५ मधील पुण्याची काँग्रेसची बैठक व सार्वजनिक सभेतून झालेली रानडे पक्षाची हकालपट्टी १८९७ सालांतली गोखल्यांची माफी, १९०७ सालांतली सुरतेची काँग्रेस आणि १९१५ साली गोखले मृत्युशय्येवर असतांना माजलेला काँग्रेसच्या समेटाचा वाद, हीं बुद्धिभेद करणाऱ्या प्रसंगांची उदाहरणें आहेत. यांतली एक बाजू लोकांना थोडी फार माहीत आहे, व तीच प्रिय असल्यानें सामान्यतः दुसरी बाजू पहाण्याचा यत्न कोणी करीत नाहीं. गोखल्यांचें चरित्र