पान:ना. गोखले चरित्र.pdf/२९५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९५
गुरुजनांबद्दल गोखल्यांचा आदर.

केलेला. गोखल्यांस वेल्बी कमिशनच्या वेळेस किंवा कौन्सिलांत जोशी यांनी पुरविलेल्या माहितीचा फारच उपयोग झाला होता. एकेपरी त्यांनी गुरुॠण फेडले. परंतु ज्या पक्षास जोशी मिळाले त्या पक्षांतील लोकांनीं या पुस्तकाच्या पाठविलेल्या व्ही. पी. सुद्धां परत केल्या हें मात्र क्षम्य नाहीं. टिळक असते तर असें खचित होऊं देते ना. दुसऱ्याविषयीं गोखले किती जपत हें सुरतच्या राष्ट्रीय सभेच्या वेळीही दिसून आलें. ज्या वेळेस टिळक छातीवर हात ठेवून हिमालयाप्रमाणं धैर्याने उभे होते, त्या वेळेस एका मवाळपक्षीय गृहस्थास त्यांची मूर्ति पाहवेना. तो टिळकांच्या अंगावर चालून जाऊं लागला. त्या वेळेस गोखल्यांनी ताडकन् उडी मारून त्या गृहस्थापासून टिळकांचें संरक्षण केलें. दुसऱ्याविषयीं त्यांस किती आपलेपणा वाटे हें या गोष्टींवरून दिसून येते. यास मनाचा मोठेपणा लागतो. आणि तो गोखल्यांच्या जवळ भरपूर होता. टिळकांविषयीं तर त्यांस आदर वाटतच असला पाहिजे. कारण, त्यांच्याच स्फूर्तीने ते डेक्कन सोसायटीत शिरले होते.
 गोखल्यांना वडील माणसांबद्दल विलक्षण आदर वाटे. रानड्यांबद्दल तर त्यांस किती आदर वाटे हें शब्दांनी सांगतां येणं शक्यच नाहीं. रानड्यांची एक पगडी त्यांनी आपल्या कपाटांत ठेवली होती. व तिचे मोठ्या भक्तिभावानें ते दर्शन घेत. रानड्यांचं चरित्र आपण लिहिलें नाहीं म्हणून त्यांस फार वाईट वाटे व वहिनीबाईंची ते नेहमी क्षमा मागत. 'My real joy is, that my true place is at his feet.' असेच उद्गार त्यांनीं निरंतर मनांत काढले असतील. आपण आजारी आहो हें दादाभाईच्याजवळ कसें सांगावें असे त्यांस वाटे. एकदां गोखले आजारी असल्यामुळे डॉ. भाण्डारकर त्यांस भेटावयास आले. गोपाळराव म्हणाले, 'मी तुमच्याकडे यावयाचें. तुम्ही मजकडे कां येतां?' 'तुम्ही आजारी आहां म्हणून मी येतो; बरे झाल्यावर मग तुम्हीच मजकडे या.' असें भाण्डारकरांनी त्यांचे समाधान करावें. मेथांविषयीं त्यांस असेच वाटे. कुटुंबांतही आईबापांविषयीं त्यांची भक्ति मोठी आदर्शभूत होती. परंतु या गुणाचें पर्यवसान पुढे निराळ्या प्रकारांत झालें असावें. जसे आपण गुरुजनांना किंवा आपल्याहून अनुभवी पुढाऱ्यांस मानतो, तसेंच आपणासही लोकांनी मानावें असें त्यास वाटू लागलें असावें असें दिसतें. त्यांच्या मित्रमंडळींत व अनुयायांत तर त्यांच्या शब्दांस