"Measure thy life by loss instead of gain
Not by the wine drunk but the wine poured forth
For love's strength standeth in love's sacrifice
And whoso suffers most, hath most to give."
ही हॅमिल्टनची उक्ति येथें यथार्थ लागू पडते.
गोखल्यांच्या गुणांमधले सरळपणा, सर्वत्र नीतीने वागणे, हे गुण गांधींना जास्त स्पष्टपणे दिसले असतील. त्यांच्याच जोडीला, अस्पृश्योद्धार व हिंदु-मुसलमान यांचे ऐक्य, या प्रश्नांवर गोखल्यांचा विशेष कटाक्ष होता. गांधींचीं तर तीं जीवनतत्त्वेंच होऊन बसली आहेत. गोखल्यांमधील या गुणांमुळेच ते गांधींचे गुरु झाले; गांधींचे अंतःकरण त्यांच्याकडे ओढलें गेलें. ही गुरु- शिष्यांची जोडी अपूर्व आहे. त्यांच्या सद्गुणांकडे आपण पहावें; त्याचें आपण मनन करावें; हे पुरुष म्हणजे पर्वताप्रमाणे असतात; आपण त्यांच्याकडे उंच उंच वर वर पहात रहावें. दृष्टि भागते; परंतु शक्य तें करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. विशेषत: आपण व्यापक दृष्टीचे झाले पाहिजे. मोठ्या वर्तुळांत फिरणे आतां आपणांस जरूर आहे. आपल्या सभोंवतालची परिस्थिति कशी आहे? -'Where the passions of greed and hatred are allowed to roam unchecked having for their allies deceitful diplomacy and a widespread propaganda of falsehood, where the soul remains caged and the self batters upon the decaying flesh of its victims.' या परिस्थितीत आपण गुरफटलो असलो, तरी आत्मिक व नैतिक सामर्थ्यानें, प्रेमाने व प्रामाणिकपणानें ही स्थिति बदलण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. अंगी सद्गुणांचे बीजारोपण करावें. ते सद्गुण प्रत्यक्ष व्यवहारांत आले पाहिजेत. 'The supreme end of our personality is to express itself in its creations.' कवि काव्यें निर्माण करतील, तत्त्वज्ञ नवीन तत्त्वें प्रसवेल. आपण तीं तत्त्वें आपल्या कृतींत, आचरणांत आणावयास नको काय? हे सामर्थ्य आपल्या अंगी येण्यास या पुरुषांचें उदाहरण नित्य डोळ्यांपुढे ठेवावे. हीं माणसें कशी असतात?-