पान:ना. गोखले चरित्र.pdf/६३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३१
टिळक-आगरकरांचें प्रेम.

पत्रांत लिहिलें आहे. "आपले म्हणणें असें असेल कीं, बाह्य व्यवहार- लोकोपचार यथास्थित रीतीनें न पाळल्यास त्यामुळे प्रेमांत कमतरता येते, तर हें म्हणणें मला बिलकुल पसंत पडत नाहीं." "बाह्य सन्मानांत किंवा व्यवहारांत कांहीं न्यूनता किंवा अपूर्णता रहात असली तर तेवढ्यानें आपणांवरून माझें मन उडालें आहे, अशा प्रकारचें अनुमान बांधूं नये." "प्रेम हा आंतरिक संबंध आहे, मग तो वरवर आपणांस न कां दिसेना." हेच उद्गार टिळक आणि आगरकर यांच्या बाबतींत आम्हांस आठवतात. इतर सर्वांपेक्षां टिळकांचेंच आगरकरांवर प्रेम होते, आणि तें खरें शुद्ध, सात्त्विक व निःस्वार्थी प्रेम होतें; असो.
 आगरकरांच्या मृत्यूने गोपाळराव गोखले फार खचले. परंतु कार्य तडीस नेणें हें पहिले कर्तव्य असल्यामुळे शोकावेग गिळून नवीन माणसें पडलेलें काम उचलावयास मिळविण्यासाठीं त्यांस खटपट करावी लागली. आगरकरांची जागा शेल्बीसाहेबांचे पट्टशिष्य गोविंद चिमणाजी भाटे यांस संस्थेत आणून त्यांनीं भरून काढली. वासुदेवराव केळकरांची जागा योग्य रीतीनें त्यांस लवकर भरून काढतां आली नाहीं. परंतु पुढें एक वर्षानें कराचीच्या कॉलेजांतील नाणावलेले प्रो. वैजनाथ काशीनाथ राजवाडे हे फर्ग्युसन कॉलेजास मिळाले. याप्रकारें चिपळूणकरांपासून प्राप्त झालेले लोण गोखल्यांनी पुढे चालू केलें. आतां ते फक्त इतिहास व अर्थशास्त्र या विषयांचेच प्रोफेसर राहिले. आणि या विषयांतच त्यांनी अलौकिक प्राविण्य संपादन केलें. तें त्यास कसें प्राप्त झालें हें आतां आपण पाहूं या.

राजकीय शिक्षणाचा काल.


 गोपाळरावांचा कॉलेजमधील व्याप जसा वाढत गेला तसा त्यांचा बाहेरील व्यापही वाढला. त्यांचा स्वभाव निरलस आणि कांही तरी नवीन शिकण्यासाठी उत्सुक असल्यामुळे संस्थेतील वादविवादांनी त्यांचं मन विषण्ण होत असे. ते उठून दुसरीकडे जात आणि कांहीं तरी वाचीत बसत.