पान:ना. गोखले चरित्र.pdf/९१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५९
मोर्ले, रेडमंड वगैरेंच्या भेटी.

रावांचा आदर दुणावला. गोपाळरावांवर आध्यात्मिक परिणाम घडविणाऱ्या तीन विभूतींपैकीं एक दादाभाई होते हें मागें एके ठिकाणीं आलेच आहे. बारीक सारीक गोष्टींकडेसुद्धां लहान मुलाप्रमाणे गोपाळरावांचे लक्ष असावयाचें. शिकवतांना सुद्धां ते कांहीं वगळावयाचे नाहींत. वाच्छा म्हणतात. 'Mr. Gokhale was a master of the minutest details.'
 इंग्लंडमधील प्रसिद्ध व्यक्तींस भेटण्याची त्यांची फार इच्छा, मोर्ले साहेबांचे ग्रंथ त्यांनी फार मननपूर्वक वाचले होते. या तत्त्वज्ञास भेटल्याशिवाय जाणें म्हणजे देवळांत जाऊन देव न पाहण्यासारखे त्यांस वाटलें असावें. त्यांस भेटून आपली धणी केव्हां तृप्त होईल, डोळ्यांचे पारणें कधीं फिटेल असे त्यांस झालें होतें. शेवटी एक दिवस ठरविण्यांत आला, आणि गोखले व मोर्ले यांची गांठ पडली. बर्कविषयीं, आयर्लंडच्या परिस्थितीविषयीं त्यांचे बोलणे झाले, मोकळेपणानें त्यांनी चर्चा केली. शाळेतील एकाद्या आनंदोत्सवाची बातमी घेऊन जसा विद्यार्थी घरीं धांवत येतो तसे गोखल्यांचे झाले. पुष्कळ वेळां ते खरोखरच मुलाप्रमाणें वागत. मुलाचा उत्साह, जिज्ञासा व अकपटपणा त्यांच्या ठिकाणी अजूनही होता व मरेपर्यंत राहिला. यानंतर आयरिश पक्षाचा जॉन रेडमंड याची ही त्यांनी भेट घेऊन 'होमरूल' ची इत्थंभूत माहिती करून घेतली. सर डब्ल्यू. वेडरबर्न यांच्या मध्यस्थीनें दुसऱ्या पुष्कळ हिंदुस्तानच्या हितचिंतकांस ते भेटून आले.
 जेथें कोठें मेजवानी किंवा खाना असेल तेथें गोखले आपली तांबडी गुलाबी पगडी घालून जावयाचे. पार्लमेंटमध्ये जाते वेळेसही आपलें राष्ट्रीय शिरोभूषणच ते ठेवीत. पाय विलायती झाले तरी डोके हिंदुस्तानी ठेवावयाचें! केंब्रिज लॉजमध्ये दुसऱ्या एक मिस् पायनी म्हणून बाई होत्या. त्यांनी गोपाळरावांचे नवीन नामकरण केलें. कॉन्ग्रीव्ह बाईनें गोपाळरावांची आजारीपणांत शुश्रूषा केल्यामुळे कॉन्ग्रीव्ह बाईचा पिंगट बच्चा- Brown Baby- असे त्या विनोदानें म्हणत. इंग्लंडमधील शिक्षण- पद्धति कशी काय असते हेंही गोपाळरावांस पहावयाचें होतें. केन साहेबांच्या खटपटीनें त्यांस हें सर्व समजून घेण्यास सांपडलें, प्रथम