पान:निखळलेलं मोरपीस.pdf/२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देशाच्या सुखदुःखाच्या चिंतेने व्याकूळ झाले होते.

 शनिवारी मध्यरात्रीच्या विमानाने सुमतीबाई सुधीरकडे अमेरीकेत रवाना झाल्या. या खटल्याच्या संदर्भात अनेक उलट सुलट बातम्या येत असत. लोक कांहीबाही बोलत. त्यामुळे अशा परिस्थितीत भाऊसाहेबाना सोडून जाण्यास त्या बिलकूल तयार नव्हत्या. पण भाऊसाहेब त्यांचे कांही एक ऐकायला तयार नव्हते. आणि सुधीरला त्यांची गरज पण होती. त्यांचा नाईलाज झाला.

∗∗∗

 सोमवारचा दिवस उजाडला. कोर्टात ठासून गर्दी होती. दोन्ही बाजूंचे सज्जे लोकलच्या डब्यासारखे गच्च भरले होते. आणखी काही लोक आंत शिरायला पाहात होते. पण त्यांना पोलीसांच्या दंडुक्याचा प्रसाद खाऊनच परतावे लागत होते. वृत्तपत्रांचे बातमीदार आपापल्या लेखण्या सरसावून बसले होते.

 बरोबर अकराच्या ठोक्याला भाऊसाहेबांनी आपल्या स्पष्ट नि स्वच्छ आवाजात निकालपत्र वाचून दाखवण्यास सुरवात केली. दोन्ही बाजूंच्या साक्षी पुराव्याची तर्कशुद्ध छाननी करत करत त्यानी अत्यंत सुस्पष्ट शब्दात, मुख्यमंत्र्यांची कार्यपद्धती ही त्यांना घटनेने दिलेल्या अधिकाराबाहेरची आहे हे स्पष्ट केले. परवाने वाटप, अखत्यारीतील निधीचा गैरवापर, ह्या साऱ्या बाबी फिर्यादी पक्षाने सादर केलेल्या पुराव्यावरुन नि:संशय सिद्ध झाल्या आहेत हे मान्य करून त्यांनी मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी हे संपूर्णपणे दोषी आहेत असा निकाल दिला.

 जसजसे निकालपत्राचे वाचन होत होते, तसतसे प्रेक्षकांच्या चेहऱ्यांवरचे भाव बदलत होते. प्रथम औत्सुक्य, कुतूहल वाटणाऱ्या नजरा, अखेरीअखेरीस चिंताक्रांत वाटूं लागल्या. न्यायसंस्थांवरचे सरकारचे वाढते दडपण माहीत असल्याने हा निकाल जरी लोकाना अपेक्षित होता, हवाहवासा होता तरी पण त्याच्या परिणामांची परिणती कशात होईल ह्याची शाश्वती नव्हती. म्हणून प्रथम जरी कोलाहल होता तरी निकालपत्रातील शेरे ऐकताऐकता त्या कलकलाटाचे कुजबुजीत रुपांतर झाले आणि चार तासाचे वाचन भाऊसाहेबांनी पुरे केले तेव्हां तर अगदी स्मशान शांतता पसरली होती....

 भाऊसाहेबांनी वाचन संपविले. सही करुन सर्व कागदपत्रांवर शिक्कामोर्तब केले. आपल्या कोटाच्या खिशातून दोन गोळ्या काढल्या. समोर ठेवलेला पाण्याचा ग्लास घेतला. एकदा शांत चित्ताने सर्व कोर्टरुमकडे बघितले. दोन्ही गोळ्या तोंडात टाकल्या

निकाल / २४