पान:निखळलेलं मोरपीस.pdf/८१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "असं कसं म्हणता आप्पा? एकसष्टीच्या वेळी गुरुदक्षिणा फेडलीय सर्वांनी."

 रात्री निजानीज झाली. आप्पांना झोप येईना. जयंता-सुलुच्या बेताच्या नोकऱ्या. आता शेखरचा इंजिनिअरींगचा खर्च. यंदा ज्योत्स्नाचं दहावीचं वर्ष. या सगळ्या धावत्या वाहनांच्या गर्दीत उद्या आपला 'पांगुळगाडा' उभा राहिला तर सगळ्यांचीच पंचाईत होईल! ही 'बायपास' कशी झेपणार कुणाला? आज कुणाला माहीत नाही. पण उद्या अतुल आल्यावर कळेलच. मग काय होईल सगळ्यांचं? सुलू तर कोसळेलच. नावाची सून. खरी ती मुलगीच म्हणायची. किती माया आहे तिची आपल्यावर? आपल्या बायपासच्या खर्चासाठी ती आकाश-पाताळ एक करेल. सगळ्यांना करायला लावेल. ब्लॉक विकून पुन्हा चाळीत राहूया असं सुद्धा म्हणेल. जयंता, शेखर, ज्योत्स्ना. सगळ्यांचं किती प्रेम आहे आपल्यावर. शेखर- ज्योत्स्ना अजून लहान मुलासारखी गोष्टी ऐकत आपल्या कुशीत झोपतात. किती जपतात आपल्याला. छे, एवढी माया लावली नसती तर कुठंतरी जीव तरी देता आला असता! शेखरच्या पन्नास हजाराची सोय बघितली पाहिजे. कुणाला तरी भेटायला हवं. उद्या आधी के.ई.एम्. हॉस्पीटलमध्ये जाऊन सर्व रिपोर्टस् ताब्यात घ्यायला पाहिजेत. अतुल आला की त्याला पूर्ण विश्वासात घेऊन समजवायला हवं की... केव्हा तरी आप्पांना झोप लागली.

∗∗∗

 दुसऱ्या दिवशी के.ई.एम्. हॉस्पिटलच्या पायऱ्या चढत चढत आप्पा कॉरिडॉरमध्ये आले तेव्हा अघटितच प्रकार घडला. दोन-तीन पेशन्टस् जीवाच्या आकांताने धावत होते. आणि त्यांच्यावर गोळ्या झाडत चौघे पाचजण स्टेनगन्, पिस्तूल झाडत पाठलाग करत होते. ‘“पळा, धावा, भागो स्मगलर्स" असा आरडाओरडा होत होता. आप्पांना चपळाईने पळता येईना. सूं सूं करत बंदुकीच्या गोळ्या त्यांच्या डोक्यात घुसल्या. छातीत घुसल्या. आप्पा रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. आजूबाजूचे आणखी काहीजण गोळ्या लागून पडले. हॉस्पिटलचा डगला घातलेल्या दोन्ही पेशंटस्च्या शरीराची घुसलेल्या गोळ्यांनी नुसती चाळण झाली. मारेकरी पळाले....

∗∗∗


 जयंता-सुलू, शेखर, ज्योत्स्ना, नातेवाईक, बिल्डिंगची माणसं आप्पांच्या फोटोसमोर उभी होती. उन्मळून उन्मळून रडत होती. अतुल, आपल्या मित्रांसह आपल्या

थँक यू मि. डेथ / ८०