या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्या सिद्धीच्या योगानें रेवणनाथांनी चमत्कार कसे केले, पुढे मत्स्येंद्रनाथांचे तेथे आगमन होऊन, त्यांस आठही सिद्धि वश असल्यानें रेवणनायांची मानहानि कशी झाली, दत्तांचा पूर्ण अनुग्रह मिळविण्याबद्दल त्यांनी नंतर कशी खटपट केली, मत्स्येंद्रनाथांनीं गिरिनारी जाऊन श्रीदत्तांस तेथें कसें आणलें, नंतर श्रीदत्तांनी रेवणनाथांस आत्मज्ञानपारंगत करुन सर्व विद्या व सर्व कलां कशां मिळवून दिल्या, याचें सुरस वर्णन " नवनाथ भक्तिसार" अध्याय ३५ यांत दिले आहे तें जिज्ञासूंनी पहावें.

 या पुढचा रेवणनाथचरित्राचा उपयोगी भाग " सिद्धांतसार" नामक ग्रंथांत सांपडतो. रेवणनाथांचे मरुळसिद्ध नामें अनुगृहीत होते. करवीरक्षेत्रीं सिद्ध पुरुषांशीं विरोध करणारी माई या नांवाची एक स्त्री होती. तिनें आपल्या पणानें कित्येक सिद्धांस बंदिशाळेत घातलें होतें मरुळसिद्ध अचानक तेथें प्रगट होऊन त्यांनी तिचा पण जिंकला, पण माईची पूर्ण "भ्रांति फेडण्याबद्दल " त्यांस गुरुंची आज्ञा नसल्याने ते गुरूकडे गेले व त्यांस करवीरास येण्याबद्दल प्रार्थना केली. रेवणनाथांनीं विनंति मान्य केली; वाटेंत रेवणगिरी पर्वतावर विश्रांती घेतली व करवीरास येऊन माईचें सर्वविष प्राशन करून तिचा पण हरण केला व ती शरण आल्यावरून

तिची एक किनरी बनविली. ती ते नेहमीं वाजवीत असत तसें म्हणतात.