पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/104

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपल्या डिंपल नावाच्या तरुण मुलीस घेऊन एड्स प्रतिबंध, एड्स जागृती, एड्स नियंत्रण असं प्रबोधनात्मक कार्य सुरू केलं. पंढरपूरची नावानं 'संत' असलेली पेठ 'असंत' होती. एक-दोन नव्हे, चांगल्या चारशे वेश्यांची वस्ती...सोलापूर, विजापूर, जत भागातून आलेल्या वेश्या...आख्ख्या महाराष्ट्राचे निर्माल्य पदरात घेत उदरभरण करायच्या...हे जेव्हा मंगलताई शहांनी पाहिलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, सांगोवांगीनं त्यांचं दैन्य सरणार नाही...नुसतं कंडोम देऊन कंडम समाज सुधारणार नाही. केवळ पथनाट्य करून त्यांचं जीवननाट्य बदलणार नाही.
 असं वाटत असतानाच एक घटना घडली. (अशा एकेक घटनांनीच सिद्धार्थ, महावीर, येशू आदींना 'धर्म' शिकवला.) पंढरपूर जवळच्या एका खेड्यात एचआयव्ही बाधित दोन मुली गोठ्यात ठेवल्याचं मंगलाताईंना कळलं. तसा त्यांचा संताप पराकोटीला पोहोचला. त्या घरच्या लोकांना काहीबाही सुनावत होत्या...बघता बघता बघ्यांची गर्दी वाढली...तसा मंगलाताईंना चेव आला...तेवढ्यात गर्दीतलं कोणी तरी म्हटलं..."ओ ताई, एवढं वाटतं, तर तुमच्या घरी घेऊन जा ना...मग कळेल या वासरांना गोठ्यात का टाकलं ते..." या संवादातला उपहास, कुत्सितपणा न कळण्याइतक्या मंगलाताई भोळ्या नव्हत्या...पण तो क्षण त्यांची सत्त्वपरीक्षा घेणारा होता. त्यांनी मागचा पुढचा विचार न करता त्या दोन मुली उराशी घेतल्या...आज ती संख्या ६० झाली आहे.
 मंगलाताईंनी १९७६-७७ च्या दरम्यान पत्र्याच्या एका शेडमध्ये एड्सग्रस्त मुली, मुलं नि महिलांच्या संगोपन व पुनर्वसनाचे काम सुरू केलं. तेव्हा लोक पैसे द्यायचे; पण संस्थेत यायचे टाळायचे...एड्सबद्दलच्या भीती व गैरसमजाचा तो काळ होता. शबाना आझमीनं एड्स निर्मूलन कार्याच्या एका जाहिरातीत एक एड्सग्रस्त मुलीला कुशीत घेतलं आणि समाज मन बदललं. ऐश्वर्या राय विश्वसुंदरी झाली नि तिनं एका जाहिरातीत नेत्रदानाचं महत्त्व 'तुम भी सुंदर दुनिया उनको (अंधो को) दिखा सकते हो...मेरी तरह!' सांगत सारं जग आपल्यासारखं केलं. अभिनेत्री नीना गुप्ताने अनाथ मुलगी दत्तक घेतली नि अनाथाश्रमातल्या मुलींचा वनवास संपला. तसं जॅकी श्रॉफ, महेश मांजरेकर, प्रवीण दवणे, मंगलाताईंना भेटले...नि प्रभाहिरा प्रतिष्ठान पत्र्याच्या शेडमधून काँक्रिटच्या घरात आलं...तसा समाजही काँक्रिट झालाय.
 मंगलाताईंच्या संस्थेस 'एड्सग्रस्त बालगृह' म्हणून शासनमान्यता आहे. अनुदानही आहे, पण समाजमान्यता नाही. आजही पंढरपूर कर्मठच राहिल्याचा

निराळं जग निराळी माणसं/१०३