पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/146

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 अशाच संस्थांत संजय हळदीकर परत काही वर्षांनी जातात. हेतू एकच, मुलांना जाणून घ्यायचं. संस्थेचा चक्रव्यूह भेदायचा...तिथल्या प्रशासनाचा कचाटा ढिला करायचा. बंद दरवाजे किलकिले करायचे नि मुलांच्या मनाची कवाडे उघडून ती स्वच्छ, मोकळी करायची. या वेळी ते विषय घेतात 'खिडकी.' फॉर्म निवडतात 'चित्र', मुलांना सांगितलं जातं... तुम्हाला कोंडून ठेवलं जातंय. वेळ काढायला काहीच साधन नसतं. असते ती फक्त खिडकी. त्या खिडकीतून बाहेर पाहताना तुमच्या मनात जे येतं ते चित्रात काढा...त्यांची चित्रं होणार होती त्यांच्या आयुष्याचे 'कवडसे'...मग त्याची प्रदर्शनं महाराष्ट्रभर भरवली गेली. दिसून काय आलं? मुलांचं जीवन अंधारलेलं असलं, तरी त्यांना प्रकाशाची आस आहे. बालपण होरपळलेलं, कुस्करलेलं असलं तरी त्यांना निसर्गाची हिरवाई साद घालते... ते निखळलेले तारे असले, तरी त्यांना ध्रुव बनायचे आहे.
 संजय हळदीकर या मुलांचे मेळावे भरवतात...मामाचा गाव, हुर्डा पार्टी, वंचितांचे स्नेहसंमेलन, नृत्यशाळा! काही वेळा संस्थेतल्या मुलांकडे दोनच रंग असतात...खडूचा पांढरा नि कोळशाचा काळा...दोनच रंगांनी मुलं चेहरे रंगवतात. कुठे आरसाही नसतो...मुलं पाण्यात...हौद, बादली, ताटात चेहरे न्याहाळतात... रंगवतात... कोण राक्षस, कोण भूत, कोण काय, तर कोण काय! चेहरा रंगवण्याच्या खेळानेच त्यांच्या चेहऱ्यावरची नेहमीची मलिनता, निराशा, एकलकोंडेपणा जातो. मुलं हरखतात...हसतात...तोंड, दात, जीभ, डोळे विचकत साधनहीन असून केवळ उपजत प्रतिभेने क्षणात साधन संपन्न होतात. नृत्य, गाण्यासाठी टमरेल, बादली, ताट, वाटी, माठ, त्यांचे ड्रम, तबला, ट्रँगल केव्हा बनतात ते कळत नाही. आपल्या शाळा, संस्था, म्हणजे मुलांना मूकनायक बनवणारे कारखाने झालेत. अशा पार्श्वभूमीवर संस्थांचे दैन्य दूर करणारा हा बृहस्पती...संजय हळदीकर मला मुलांच्या सुप्तगुणांना फुलविणारा जादूगार वाटत राहतो. मुलं नायक, नायिका (खलनायक नाही) कधीमधी विदूषक होतात. अन् संस्थेतील स्मशानशांतता विरून जाते कशी!
 मुलांचं जग निराळे...त्यातही वंचितांचं जग, वंचित मुलांचं आणखी निराळे...ज्यांना खरं म्हणजे काही नाही त्यांना सर्वकाही द्यायला हवं. आपण काहीच देत नाही. स्वातंत्र्याच्या चौसष्ठ वर्षांच्या प्रवासात मित्रांनो, आपल्या मायबाप सरकारने या मुलांना अन्न, वस्त्र, निवारा काय दिला...सरकारला मोक्ष मिळाला अशीच सारी स्थिती. आपल्या देशात गरिबी, अज्ञान, अंधश्रद्धा, नैतिकता इ. अनेक कारणांनी वंचित मुलं निर्माण होतात. मुलं अंध, अपंग, अनाथ, अनौरस, भटकी, भिक्षेकरी, बालमजूर, बालगुन्हेगार असत नाहीत.

निराळं जग निराळी माणसं/१४५