पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/23

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खुळ्यांची चावडी : मनोरुग्णालय

 मनोरुग्णांचं निराळं जग कोणत्याही संवेदनशील माणसाला व्यथित, चिंतित करणारं, शहाण्या माणसांचा सारा समाज खुळ्यांची चावडी ठरवणारं. लहानपणापासून अनाथाश्रमांच्या जगात वाढताना मनोरुग्ण पाहिले होते. पण त्यांच्याकडे डोळेझाकच सुरू होती. डोळे उघडले हळूहळू. पण, समाज मनोरुग्णांकडे उघड्या डोळ्यांनी कधी पाहणार?
 मी लहानपणी पंढरपूरच्या बा. बा. नवरंगे बालकाश्रमात होतो. संस्थेच नाव बालकाश्रम असलं, तरी तिथे एक दिवसाच्या बाळापासून ते शंभर वयाच्या आजीपर्यंत सुमारे ३०० जण होते. मुलं, मुली व महिला. अनाथ, कुमारीमाता, परित्यक्ता, विधवा, वृद्धा, वेश्या, मुक्या स्त्रिया! कोण नव्हतं तिथे असा प्रश्न पडेल, अशी स्थिती. इथले कोणीच कुणाचे नव्हते. म्हणजे तुम्ही घरात कसे रक्ताच्या नात्याने आई, वडील, भाऊ, बहीण, काका, मामा असता, तसे आम्ही नसलो, तरी ही सारी नाती आमच्यात होती. अर्थात, मानलेली.

 मी ज्या खोलीत राहात होतो, तिथे एक खोली सोडून 'वेड्याची खोली' होती. तिला आम्ही शालिनीची खोली म्हणत असू. शालिनी आमच्या आश्रमातली अविवाहित प्रौढा. आश्रमात मुली उपवर झाल्या की, त्यांची लग्न व्हायची. लग्नापूर्वी केळवणं, ओटी भरणं सारं असायचं. कुणाचं लग्न ठरल्याची कुणकुण लागली की, शालिनीच्या अंगात यायचं. वेडाचाच झटका तो. एरवी शांत, अबोल असलेली शालिनी क्रुद्ध, आक्रमक, बडबडी बनायची. अंगात एक वेगळ्या तेजाचा संचार व्हायचा तिच्यात. मग तिला तिच्या खोलीत डांबलं

निराळं जग निराळी माणसं/२२