पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/24

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

जायचं. तिला खोलीत डांबायला दहा बायका लागायच्या. सर्वांना पुरून उरायची ती! आपलं लग्न नाही केलं. या रोजच्या अन्यायाच्या भावनेतून हे बळ तिच्यात येत असावं. खोलीत कोंडलं की, ती घाण्याच्या बैलासारखी घरभर गाणं म्हणत फिरायची. गाणी असंबद्ध असायची; पण आमच्या आकर्षणाचं केंद्र व्हायची. 'बाबा गेले पैठणाला', 'बापू याऽऽ या', 'ताई याऽऽ या', असं काही बाही बरळत, बडबडत राहायची. बालपणी आम्हा सर्व मुलांसाठी वेडी शालिनी, आंधळी लीला, लुळी मुन्नी, मुकी लोल्या, बोबडी उंदी, ढब्बी अव्वा, भाजलेली रांजी या सगळ्या जणी चेष्टा, मस्करी, चिमटे, मागं लागणं अशा बाललीलांचं साधन होत्या.
 वयानं थोडा मोठा झाल्यावर मी कोल्हापूरच्या रिमांड होममध्ये आलो. तिथंही अधीमधी खुळी मुलं यायची. पोलिस त्यांना धरून आणायचे. रस्त्यावर दंगा केला, हल्ला केला, नागडा फिरतो म्हणून. त्याला लगेच रत्नागिरीच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवलं जायचं. पण, बदलीपर्यंतच्या काळात तो मुलगा सर्व संस्था डोक्यावर घ्यायचा.
 या खुळ्या-वेड्यांकडे मीही डोळेझाकच करत असे. माझे बंद डोळे उघडले ते, जेव्हा मी आजारी पडलो आणि मला कोल्हापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं तेव्हा. सी.पी.आर. हॉस्पिटलची मुख्य वास्तू म्हणजे जुनं किंग एडवर्ड हॉस्पिटल. त्यामागे पूर्वी पेशंट्सना ठेवलं जायचं, त्याला 'खुळ्याची चावडी' म्हणायचे. तिथंच रिमांड होम, जेलमधील मुलामाणसांना ठेवायचे. त्या हॉस्पिटलमध्ये घालवलेले ते तीन दिवस! माझा ताप उतरण्याऐवजी चढतच राहिला. डॉक्टरांच्या लक्षात आल्यावर त्यांनी ‘याला संस्थेतच ठेवा, लवकर बरा होईल', असे म्हटले अन् तसंच झालं. मी बिनऔषधाचा बरा झालो.
 मी प्रौढ झालो अन् या संस्थांचे काम करू लागलो. माझ्या लहानपणापासून वेड्यांचं जे जग मी पाहिलं, अनुभवलं होतं त्यानं मला विकल केलं होतं. विकल करण्याची अनेक कारणे होती. ती वेडी शालिनी जेव्हा चांगली, धडधाकट असायची, तेव्हा माझा सांभाळ करायची. मोठा झालो तसं तिच्या वेड्याचं कारण समजून विचार करत राहायचो. आश्रमानं तिचं लग्न केलं असतं तर? आश्रमानं तिच्यावर उपचार केले असते तर? पण, त्या तीनशे माणसांच्या घरात शालिनीचा एकटीचा विचार करायला सवड कुणाला होती?

 ज्योत्स्नाताई! शालिनीसारखीच माझ्या मानलेल्या आईची, म्हणजे मला जिने सांभाळलं त्या आईची पोटची मुलगी होती ज्योत्स्ना. आम्ही तिला ताई

निराळं जग निराळी माणसं/२३