पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/29

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आनंद बडवे यांनी एके दिवशी अचानक अकारण उत्पादन बंद केलं. मोठी माणसं वेडी असतात, त्याचा हा पुरावा.
 दुसरीकडे मीराताईंनीही मुलीसाठी नोकरी सोडलेली; पण मुलीचं लग्न झाल्यावर काय करायचं म्हणून पुण्याच्या कोरेगाव पार्कमधील सरकारी निवासी अंधशाळेत नोकरी मिळते का, म्हणून पाहायला गेल्या. जिन्यातच एका लहान अंध मुलानं मीराताईंना मिठी मारली. त्यांनी त्याला कडेवर घेतलं, तर स्वारी उतरायचं नावच घेईना. मीराताईंना त्या अनाथ, अंध मुलानं त्या क्षणी जगण्याचा अर्थ समजावला. मीराताईंनी 'नोकरी' न करता 'सेवा' करायचं ठरवलं नि आपलंही वेडेपण सिद्ध केलं.
 दोन वेडे पतिपत्नी एकत्र आले. त्यांनी पाहिलं की, आपल्याकडे अंधांना औपचारिक शिक्षण मिळतं. पण त्यांच्या महत्त्वाकांक्षा, इच्छा, स्वप्नानुसार शिकण्याची सोय नाही. मग त्यांनी प्रत्येक अंध मुलामुलींच्या इच्छेनुसार त्यांना त्यांच्या उच्च शिक्षणात मदत करण्याचा निर्णय घेतला. कारण एकच होतं, आपल्याकडे असलेल्या साधनसंपत्तीचा असा उपयोग करायचा की, त्यातून आपणास दुसऱ्यासाठी काहीतरी निरपेक्ष केल्याचा आनंद मिळावा. हे सारं 'निवांतपणे' करायचं ठरवून ते दोघे करत राहिले व त्यातून 'निवांतपणे' एकदा कधीतरी 'निवांत अंध मुक्त विकासालय' सुरू झालं. निवांत शब्दाला आनंद आणि मीराताईंनी आपल्या कार्यातून एक नवा अर्थ दिला. 'निवांत' म्हणजे निरपेक्ष, अप्रसिद्ध, सहज! ही समाजसेवेची एक नवी, अनौपचारिक शैली आहे. जगण्याचा एक मार्ग आहे, ती अंधशिक्षण व पुनर्वसनाची नवी दृष्टी आहे!
 असं ठरलं की, मीराताईंनी शिकवायचं आणि आनंदानं सांभाळायचं! म्हणजे मीराताईंनी प्रत्यक्ष शिक्षण पाहायचं नि आनंदनी संस्था, प्रशासन, अर्थकारण, विकास इ. पाहायचं. काम दोघांचं; पण ते मीराताईंचं म्हणून ओळखलं जातं. या कामात आनंद भूमिगत कार्यकर्ता असतो. सर्व करतो; पण कुठेच नसतो. राजापूरची गुप्त गंगा होणं त्याला आवडतं. स्त्रीविकास व्हायचा, तर पुरुष दुय्यम व्हायला हवेत. प्रत्येक यशस्वी स्त्रीमागे एका भूमिगत पुरुषाचं बलिदान कार्यरत असतं!
 'निवांत अंध मुक्त विकासालय' हे कसलं नाव? असं कुणी विचारेल, तर त्याचं सरळ, सोपं उत्तर असं की, ते अंधांचं अभिनव सर्वशिक्षा अभियान आहे. ते आहे अंधांचं एकलव्य विद्यापीठ. इथे प्रवेश अर्ज नाही. मुलाखत नाही, शिक्षणाची पूर्व अट नाही, अभ्यासक्रम नाही, वेळापत्रक नाही, फी नाही,

निराळं जग निराळी माणसं/२८