पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/41

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पैशाचा अपव्यय करणारं नसतं. ते फुकट नसतं. महिला पर्सभर पैसे भरून प्रशिक्षण घेतात म्हणून पोतं भरून पैसे घरी आणतात. आज शहरात दहा हजार, तर खेड्यात ३० हजार महिला प्रशिक्षित होऊन स्वयंसिद्धा झाल्यात. या संस्थेचं, तिच्या कार्यपद्धतीचं हे सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे की, प्रशिक्षण म्हणजे भाषण नाही. प्रात्यक्षिक, कौशल्य, विकसन, अनुभव कथन, कार्यानुभव, बीज भांडवल पुरवठा, उत्पादनाची विक्री शाश्वती सर्व नियोजनबद्ध. कफल्लक म्हणून या आणि कोट्यधीश होण्याची उर्जा घेऊन चला.
 स्वयंसिद्धा संस्था शिबिरे, कार्यशाळा, तंत्रज्ञान विकास, अपारंपारिक शिक्षण, अपारंपरिक साधन विकास, शिकत कमवा, परिसर विकास, सांस्कृतिक संवर्धन, संघटन अशा अनेक अंगांनी कार्य करते. कार्याचं वेळापत्रक नाही. ते गरजू महिलेवर ठरतं. तिच्या कलाने व तिच्या गरजेनुसार ते आखलं जातं. अवघ्या पाच स्त्रिया एकत्र आल्या की प्रशिक्षण सुरू. प्रशिक्षणार्थी अधिक झाल्या की, फी कमी. तुम्ही संस्थेत यायचं नाही. संस्था तुमच्या दारी, संस्थेच्या या अभिनव कार्यपद्धतीमुळे एक झालं की मोठमोठे उद्योग, संस्था, विद्यापीठे, इतकंच काय शासनही आता स्वयंसिद्धाकडे येतं. एकच उदाहरण सांगतो, महाराष्ट्र शासनाने महिला सक्षमीकरणासाठी ‘कृषिसप्तक' योजना सुरू केली. ती जिल्हा परिषदेकडे सोपविली. तिथले कृषी कर्मचारी, अधिकारी पुरुष, खेड्यातल्या स्त्रिया दाद देईनात. शासन स्वयंसिद्धाकडे आलं. स्वयंसिद्धाने पहिल्यांदा आपले कार्यकर्ते माती परीक्षण, पीक तंत्रज्ञान, पाणी नियोजन, अवजार वापर, पशुपालन, गांडूळ शेती, कीटकनाशक फवारणी, फळबाग, फुलबाग यात तयार केले. अर्थातच खेड्यातील. मग त्यांनाच आपापसांत महिलांना गोळा करायला लावून त्यांच्याच शेतीत कृषिसप्तक योजना राबवली आणि गावंच्या गावं बदलली. 'जिच्या हाती शेतीची जबाबदारी, ती गाव उद्धारी' असा नवा वाक्प्रचार नव्हे, लोकप्रचार रूढ झाला. वाक्प्रचार शाब्दिक असल्याने निष्फळ ठरतात. लोकप्रचाराला क्रियेची जोड असल्यानं ते सुफळ, संपूर्ण होतात. हे कोल्हापूर जिल्ह्याने महाराष्ट्राला दाखवून दिलं. ते स्वयंसिद्धा संस्थेमुळे. ही संस्था पैसा देत नाही. साधनं देते. शेळीचं कोकरू देते. ते शेळी झालं...वेत झाला की कोकरूनंच कोकरूची परतफेड करायची. ते कोकरू दुस-याला दिलं जातं. केल्याने होते, हा विश्वास हेच स्वयंसिद्धाचं तत्त्वज्ञान.
 कांचनताई या माझ्या समवयस्क... दोन एक वर्षांनी लहान असतील... मी त्यांना श्री मौनी विद्यापीठात शिकत असताना प्रथम पाहिलं. पुढे मी हिंदी शिक्षक, प्राध्यापक व त्या बँक लिपिक, अधिकारी, हिंदी कार्यक्रमातून भेट

निराळं जग निराळी माणसं/४०