पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/65

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पाहिजे? नाही केलं तर काय होईल? रुग्ण गरीब असायचे. खर्च झेपायचा नाही. शस्त्रक्रिया टाळण्यावर त्यांचा भर असायचा; पण रुग्णाच्या प्राणापुढे त्यांनी कशाचीच पर्वा केली नाही. हेही तितकंच खरं! एकच व्यक्ती नाहीतर आख्खं घर, कुटुंब दत्तक घ्यायचं नि उभारायचं, असे अचाट प्रयोग मावशींनी अनेकदा बिनबोभाट पार पाडलेत. कधी कधी पदरमोड करून त्या टोकाचं करत राहायच्या. केलेलं या कानाचं त्या कानाला कळायचं नाही. करून नामानिराळे राहण्यातलं त्यांचं संतपण उपजत होतं. संगीत, तत्त्वज्ञान, नाटक, पाककला, शेती कुटुंब, अध्यात्म, हिशेब, प्रशासन; सर्वांत मावशींची हुकमत चकित करायला लावणारी. आतिथ्य व शुश्रूषा हे तिचं हुकमी क्षेत्र, त्यात तिची मास्टरी. कुणालाच त्याची सर यायची नाही. ८ ऑक्टोबर १९९८ ला मावशींनी जगाचा कायमचा निरोप घेतला तेव्हा आश्रमच नाहीतर कोकणची पंचक्रोशी मौनपणे हमसत राहिली. तो हंबरडा अजून त्या पंचक्रोशीतील वाड्या, वस्तीत घुमतो आहे... स्मरण म्हणून! पोकळी होऊन!

•••

निराळं जग निराळी माणसं/६४