पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/68

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिकत, मिळवत स्वत:ला कार्यकर्ती म्हणून घडवत होत्या. 'कोकणची कस्तुरबा' होण्याच्या मनीषेने त्या कोकणात परतल्या नि कणकवलीच्या गोपुरी आश्रमात राहू लागल्या. 'कोकणचे गांधी' म्हणून ओळखले जाणारे अच्युतराव पटवर्धन त्या वेळी गोपुरी आश्रम चालवत.
 कुमुदताई रेगे यांनी एव्हाना गांधी विचारार्थ आपलं जीवन वाहण्याचा निर्णय घेतला होता. घरी लग्नाच्या गोष्टी निघत. त्यास साफ नकार देत. पुढे त्यांनी घरच नाकारायला सुरुवात केली. गोपुरी आश्रम त्या वेळी गांधीवादी कार्यकर्त्यांचं केंद्र होतं. तिथं दुभत्या गाईची पैदास प्रचार, गोशाळा, मृत जनावरांची कातडी कमावणं, शेती प्रयोग, संशोधन चालायचं. सर्व पुरुष कार्यकर्त्यांत कुमुदताई एकट्या स्त्री. हे सारं निष्ठा नि ध्येयवादामुळे शक्य होतं. इथं रुळल्या असतानाच सासवडहून तिथल्या कस्तुरबा ग्रामसेविका विद्यालयाच्या गांधीवादी संचालिका प्रेमाताई कंटकांचा निरोप आला. तिथं ग्रामसेविकांना प्रशिक्षण देणारं केंद्र सुरू करायचं होतं. त्यासाठी कुमुदताई प्रशिक्षक म्हणून त्यांना हव्या होत्या. कुमुदताईंनी तिथं राहून तीन तुकड्यांचं प्रशिक्षण पूर्ण केलं. या ग्रामसेविकांना कुमुदताई आरोग्य सेवा, स्वच्छता, साथीच्या रोगांचे उपचार, बालशिक्षण, प्रौढ साक्षरता, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती इ. विषयांचे प्रबोधन, प्रशिक्षण देत.
 सन १९५३ ते ५८ मध्ये सासवडला ग्रामसेविका प्रशिक्षण कार्य पाच वर्षांपर्यंत कुमुदताई करत राहिल्या आणि त्यामुळे त्यांना ग्रामीण शिक्षणासंबंधी संशोधनाची संधी मिळाली. त्या वेळी भारत सरकारच्या वतीने ग्रामीण शिक्षण संशोधन शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली होती. कुमुदताईंचा स्वभाव नित्य नवं शिकण्याचा असल्यानं त्यांनी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला होता. डॉ. जे. पी. नाईक व डॉ. चित्रा नाईक त्या वेळी गारगोटीच्या मौनी विद्यापीठात होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 'ग्रामीण प्राथमिक शाळा व ग्रामीण सामाजिक संस्था यांचे परस्परसंबंध' विषयावरील संशोधनासाठी कुमुदताई रेगेंची निवड झाली व त्या गारगोटीच्या मौनी विद्यापीठात डेरेदाखल झाल्या. सन १९५८ ते १९६१ असं तीन वर्षे हे संशोधन होत राहिलं. मौनी विद्यापीठाच्या 'शिक्षणातून समाज परिवर्तन' या सूत्राचं अनुभवजन्य प्रात्यक्षिक कार्य त्या इथल्या वास्तव्यात रोज अनुभवत होत्या. विद्यापीठात संस्था, वैद्यकीय तज्ज्ञांची रेलचेल, समृद्ध ग्रंथालय, ग्रामीण परिसर सर्व अनुकूल वातावरण लाभल्यानं निर्धारित वेळेत त्या संशोधन पूर्ण करू शकल्या. शिवाय त्यांची चिकाटी, प्रयत्न जोडीला होतेच.

निराळं जग निराळी माणसं/६७