पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/7

हे पान प्रमाणित केलेले आहे.

अनेकांनी खरे करून दाखविले आहे. प्रा. लवटे यांनी उसवलेले आयुष्य सोसले आहे आणि आयुष्यभर त्यांनी इतरांच्या उसवलेल्या जीवनास टाके घालून शिवण्याचे कामही केले आहे. त्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या लोकसेवेचा व त्यामध्ये त्यांच्या प्रकारेच काम करणाऱ्या 'दीनबंधू'चा खोल असा परिचय आहे. त्यांच्या कर्माची त्यांना माहिती आहे, त्यामुळे या पुस्तकातील त्यासंबंधीचे चित्रण प्रत्ययकारी झाले आहे. त्या सर्व लोकांना त्यांनी दु:खितांचे दु:ख सरावे म्हणून प्रयत्न करणारे म्हटले.
 प्रा. लवटे यांनी मनोगतात तीन जगांची कल्पना मांडली आहे. त्यांच्या मते, पहिले जग म्हणजे प्रस्थापितांचे सुव्यवस्थित व सुखी जग, दुसरे जग हे अस्पृश्य समजल्या गेलेल्या, गावकुसाबाहेर राहिलेल्या दलितांचे जग आणि तिसरे जग हे अनाथ, परित्यक्ता, निराधार, बालगुन्हेगार, वेश्या, वृद्ध, बलात्कारिता स्त्रिया, अंध, अपंग, मतिमंद, मनोरुग्ण, तृतीयपंथी, आपदग्रस्त, बंदी व अपराधी अशा वंचितांचे जग. हे तिसरे जग आपोआप निर्माण झालेले नाही. पहिल्या जगानेच त्याची निर्मिती केली. त्या जगात असणारा स्वार्थ, हिंसा, लोभ व इतरांचे शोषण करण्याची इच्छा यातून हे जग निर्माण झाले. या वंचितांच्या जगात स्त्रियांची संख्या मोठी, कारण पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या व त्यातून निर्माण झालेल्या बुभुक्षेच्या त्या बळी. या तिस-या जगाचे दु:ख अनिवार आणि जगण्याची धडपड जबरदस्त. त्याकडे तथाकथित समाजाचे दुर्लक्षपण मोठे. पण या लोकांना मदत करणारे, त्यांचे अश्रू पुसणारे, त्यांना प्रगतीचा व नवजीवनाचा मार्ग दाखवणारे काही समाजसेवक व संस्था निर्माण झाल्या आणि त्यांच्या प्रयत्नांतून अनेकांचे जीवन तुलनात्मकदृष्ट्या सुखावह झाले. अनेकांना प्रगतीचा मार्ग खुला झाला. त्यांनी समाजसेवेचा जो मार्ग आहे तो जास्त व्यापक करण्याचा प्रयत्न केला. त्या सर्वांची कहाणी प्रा. लवटे यांनी त्यांच्या विविध लेखांतून सांगितली आहे.
 या पुस्तकाचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात आठ लेख असून त्यात प्रा. लवटे यांनी वेश्या, मनोरुग्ण, अंध, अपंग, परित्यक्ता व स्त्रिया, बालक व बालगुन्हेगार व तुरुंग यांच्या बाबतची माहिती दिली असून त्याच्या कल्याणासाठी काम करणा-या संस्थांचे कार्य वर्णन करून सांगितले आहे. त्यात मुंबईच्या प्रार्थना समाजाने चालविलेल्या पंढरपूरच्या बालकाश्रमाचा समावेश होतो. या आश्रमाबद्दल प्रा. लवटे यांना खास ममत्व वाटते, कारण त्यांची तेथेच जडणघडण झाली. वेश्या व्यवसाय करणाच्या मुलीच्या न्यायालयातील खटल्याच्या संदर्भातील सर्वांना अस्वस्थ करणारी घटना या पुस्तकात वर्णन केली आहे. वेश्यागृहे, त्यात धंद्यासाठी आणलेल्या निराधार मुली, त्यांच्यावर