पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/75

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महिला, वृद्ध असे स्वतंत्र विभाग करणे शक्य झालं. यातून सुविधा, संस्कार, वळण, अभ्यास अशी चौफेर प्रगती संस्थेतील कार्यात दिसू लागली. संस्थेस राष्ट्रपती, मुख्यमंत्री इ. मान्यवरांच्या भेटी नियमित झाल्या व त्यातून संस्थेस दलित मित्र, राष्ट्रपती पुरस्कार मिळून राज्यमान्यता लाभली.
 कार्य विस्तारातून काम करणाऱ्या महिलांचे वसतिगृह, महिला वृद्धाश्रम इ. संस्था सुरू झाल्या. सर्वांवर दादांची नजर असायची. आर्थिक स्थैर्याबरोबर परिपाठावरही दादा लक्ष देत. सर्व संस्थांना भेटी देत. आहार, आरोग्य, स्वच्छता, उपचार, शिक्षण, कपडे, खेळणी, साधनं सर्वांवर घरासारखं त्यांचं लक्ष असायचं. पावसाळा आल्या की छत्र्या, हिवाळा आला की स्वेटर्स, उन्हाळा आला की चप्पल्स संस्थेस येत. सणावारी गोडधोड असायचंच. दादांना घेणं कळायचं तसं देणंही. चीनने भारतावर आक्रमण केलं होतं. देशभर संरक्षण निधी गोळा करणं सुरू होतं. दादांनी आश्रमातर्फे १५१/- रुपये शुभेच्छा कार्ड विक्रीतून उभे करून पाठवले. त्याची वृत्तपत्रांनी दखल घेतली. युद्धजन्य परिस्थितीत विकास कामांवरील अनुदानात कपात होती. केंद्र शासनाने अपवाद करून संस्थेच्या वर्किंग वुमन्स हॉस्टेलला अनुदान मंजूर केलं. याला दादांची दूरदृष्टीच कारणीभूत ठरली.
 दादा ताटके म्हणजे नुसते संस्थाचालक नव्हते. त्यांच्यात एक प्रेमळ आई व जबाबदार बाप दडलेला होता. आलेल्या प्रत्येक मुला-मुली, महिलांचा प्रश्न त्यांना माहीत असायचा. त्या प्रत्येकाच्या प्रत्येक प्रश्न सोडविण्याची योजना असायची. 'Stich in time' हे त्यांचं तत्त्व अनुकरणीय होतं. मुलांचं दत्तकीकरण शाळा प्रवेश, उपचार, शस्त्रक्रिया, मुलींची लग्न, परित्यक्तांचे तंटे, वृद्धांचं सुख, मुलींच्या नोकऱ्या सर्व एकाच वेळी करत राहून दादांनी आपलं अष्टावधान सिद्ध केले. व अष्टपैलू व्यक्तिमत्त्वही. कोर्ट, शासन, देणगी, विकास योजना, संस्था बैठका सारं कसं नियमित असायचं नि त्याचा सर्वांना अचंबा अशासाठी वाटायचा की दादा हे सर्व आपली नोकरी सांभाळून करत असायचे व त्यात त्यांची सचोटी, पारदर्शिता वादातीत असायची. त्यांचा नैतिक धाक प्रचंड होता. संस्था व दादांच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी एकाच वेळी दोन अर्ज होते. पैकी एक स्वीकारणार म्हटल्यावर दादांनी संस्थेस, प्राधान्य दिलं ते संस्थेस साहाय्य अधिक मिळावं म्हणून. पुरस्कार घ्यायला पण ते दुसऱ्याच्या नावाची शिफारस करत. यावरून त्यांचं निरपेक्षपण अनेकदा सिद्ध झालं.

निराळं जग निराळी माणसं/७४