पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/76

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 संस्था म्हटली की असंतुष्ट असतातच. काही न करता उणीदुणी काढत राहण्यातून महर्षी कर्वे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील वाचले नाहीत, तिथे दादा कसे अपवाद असतील? संस्थेस सर्वोच्च पदावर पोहोचवून निवृत्त होऊ इच्छिणारे दादा; पण त्यांच्या निरिच्छपणावर शंका घेणारे अस्तनीतले निखारे होतेच. एकदा तर अशा महाभागांनी त्यांना निनावी पत्र लिहून (नावानं लिहायला नैतिक अधिष्ठान व कार्यपरंपरा लागते!) त्यांना संस्था सोडायला सुचवलं. दादांनी ते पत्र शिरसावंद्य मानून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. आपल्यावर होणाऱ्या साऱ्या आरोपांचा निरास करून निष्कलंक निवृत्ती नैतिक अधिष्ठान असल्याशिवाय लाभत नसते. हा समाजापुढे कृतीतून उभारलेला दादांचा अनुकरणीय आदर्श!
 दादांची कर्तृत्वशक्ती, सकारात्मकता व मेहनती वृत्ती यामुळे केवळ माटुंग्यातच नाही तर वसईत उभारलेल्या संस्थेच्या इमारती. कार्यविस्तारामुळे तेथील ख्रिश्चनांची दृष्टी व विचार बदलले. तिथे उभारलेला संस्थेचा महिला वृद्धाश्रम म्हणजे दादांच्या कर्तृत्वाचा आणखी एक पुरावा म्हणावा लागेल. सन १९६७ च्या १ जूनला तो वसईला सुरू झाला. पुढे स्थलांतरितही झाला.
 दत्तक योजना यशस्वी झाल्यानंतर नि खरं म्हणजे संस्थेचा पूर्ण अंतर्गत विकास, विस्तार झाल्यावर, स्थैर्य आल्यावर दादांना संस्थेनं समाज विस्तार कार्यात लक्ष घालावं असं वाटू लागलं. एक योजना, स्वप्न पूर्ण झालं की, दादा नव्या स्वप्न, योजनेत गुंग व्हायचे. त्यातून 'विद्यार्थी दत्तक पालक योजना' त्यांनी सुरू केली. 'सहस्त्र विद्याभोजन' ही कल्पना दादांची. एक मुलाच्या संगोपन शिक्षणाचा खर्च दात्यांनी प्रायोजित करायचा. समाजातील अनाथ, निराधार, दारिद्र्यरेषेखालील मुलं, मुली निवडायची. त्यांना अर्थसाहाय्य करायचं अशी ती योजना, अशी योजना 'कास्प प्लॅन' मार्फत डॉ. शरच्चंद्र गोखले यांनी सुरू केली होती. ते मॉडेल दादांच्या समोर होतं. संस्थेनं ते मनावर न घेतल्यानं दादांनी स्वतः अन्य प्रकारे 'रामकृष्ण चॅरिटीज' तर्फेही राबवली. त्यातूनही संस्थेत समज-गैरसमज होत राहिले. संस्था विकास व विस्ताराबरोबर सहकाऱ्यांचा दृष्टिकोन विस्तारत नसल्याने संघर्षाचे प्रसंग उभारतात. सहकाऱ्यांचा कामातील काठावरचा नाममात्र सहभाग हेही त्याच एक कारण असतं. निवृत्तीनंतर दादांनी तीही योजना स्वबळावर पूर्ण करून दाखविली.<बर> दादा ताटके संस्थेच्या कार्यातून विदेशात जाऊन आले. त्यांना अनेक पुरस्कार, मान-सन्मान लाभले. दादांना संस्थेमुळे जे मिळालं त्यापेक्षा संस्थेस दादांच्या त्याग, परिश्रम, समर्पणातून अधिक मिळालं हे सांगायला ना कोणी

निराळं जग निराळी माणसं/७५