पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/8

हे पान प्रमाणित केलेले आहे.

राज्य करणाऱ्या मालकिणी, या काळ्या धंद्याची सूत्रे हलवणारे व्हाईट कॉलर सोशल वर्कर, पोलीस, दलाल, पंटर यांची त्यांनी माहिती दिली आहे. त्यांच्या मते वेश्यांच्या या जगात काहीच निश्चित नसतं. या पुस्तकातील विविध संस्था दुर्दैवी माणसांच्या जीवनात कसा बदल घडवून आणतात याचे विवेचन प्रा. लवटे यांनी स्वयंसिद्धा, हेल्पर्स ऑफ हँडिकॅप्ड, बालकाश्रम आणि बालकल्याण संकुल यांच्या कार्याच्या संदर्भात केले आहे.
 पुस्तकाच्या दुसऱ्या भागात या वर्गासाठी काम करणा-या १७ सेवाव्रतींच्या कार्याची थोडक्यात प्रा. लवटे यांनी माहिती करून दिली आहे. त्यामध्ये मातृमंदिरच्या इंदिराबाई हळबे, कुमुदताई रेगे, दादासाहेब ताटके, विजयाताई लवाटे, अजीजभाई भयाणी, रमाकांत तांबोळी, मंगला शहा, गिरीश कुलकर्णी, संगीता व भरत निकम, संजय हळदीकर व पवन खेबूडकर इत्यादींचा त्यांनी त्यात समावेश केला आहे. भारतातील समाज कल्याणाच्या कार्याचे सूत्रधार व थोर समाजशास्त्रज्ञ डॉ. शरच्चंद्र गोखले यांच्यावरचा लेख मनोज्ञ आहे. डॉ. गोखले लोकमान्य टिळकांचे सहकारी दा. वि. गोखले यांचे चिरंजीव. १९८० च्या उत्तरार्धात ते 'केसरी' चे संपादकपण होते. परंतु त्यांचे मुख्य कार्य समाजकल्याण व बालकल्याण या क्षेत्रातच कसे होते, हे प्रा. लवटे यांनी त्यांच्या लेखात उत्तम प्रकारे दाखवले आहे. विजयाताई लवटे आणि अजीजभाई भयाणी यांच्या कार्याचेपण त्यांनी चांगले चित्र रेखाटले आहे. या सेवाव्रतींनी आपला वैयक्तिक लाभ बाजूला ठेवला. कुटुंब व समाज यांच्यात योग्य असा समतोल साधला आणि असंख्य लोकांच्या जीवनात आंतरसंबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांना चांगले संस्कार दिले आणि धर्मनिरपेक्षता व वैश्विक बंधुभाव जागवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणून प्रा. लवटे म्हणतात की हे सेवाव्रती नसते तर आपला समाज जास्त ओंगळ व बीभत्स झाला असता. या सेवाव्रतींनी माणुसकीची कुंकर घालून जे काम केले ते समाजातील वंचितांना दिलासा देण्याचे काम आहे.
 ‘निराळं जग, निराळी माणसं' हे पुस्तक प्रा. लवटे यांच्या समाजसेवेच्या दीर्घ अनुभवाचे फळ आहे. निरनिराळ्या संस्था चालवताना, निरनिराळ्या महत्त्वाच्या सरकारी समित्यांवर काम करीत असताना त्यांना जे अनुभव आले, त्यांना जी माणसे भेटली, त्यांनी ज्या संस्था पाहिल्या त्याचे अनुभवसिद्ध वर्णन या पुस्तकात आहे. ते शेवटी असे म्हणतात की, या वंचितांच्या तिस-या जगाशी असलेली त्यांची स्वत:ची नाळ ते तोडू शकलेले नाहीत, कारण त्यानेच त्यांना संवेदनशील बनवले आहे.