पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/81

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करून दिली. पुढे पुलोद सरकारच्या काळात मुख्यमंत्री शरद पवार यांनी त्यांची नियुक्ती महाराष्ट्र स्टेट प्रोबेशन अँड आफ्टर केअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी (१९८९) केली. या काळातच 'बाल न्याय अधिनियम - १९८६' च्या अंमलबजावणीचे कार्य त्यांना करता आले.
 डॉ. शरच्चंद्र गोखले यांचे शासकीय व स्वयंसेवी संस्था व यंत्रणा अशा स्तरांवरचे हे बालकल्याणकारी संस्थापक कार्य असले, तरी बालकल्याणाच्याच क्षेत्रात त्यांनी संस्थाबाह्य स्वरूपाचे जे कार्य 'कास्प' व 'कास्प प्लॅन' या दोन संस्थांच्या माध्यमातून केले ते महाराष्ट्रातील बालकल्याणकारी कार्यास नवी दिशा व मार्ग दाखविणारे ठरले. बालकल्याणाच्या क्षेत्रात डॉ. गोखले यांनी अनेक भूमिका बजावल्या. शासकीय अधिकारी, नीती निर्धारक, स्वयंसेवी संस्था प्रमुख, बालकल्याणाचे सिद्धांत व उपयोजन, पत्रकार, संपादक, आंतरराष्ट्रीय संघटक अशा भूमिका बजावत त्यांनी आयुष्यभर बालकल्याण धोरण, बालकल्याण योजना, बालकल्याण कायदे, बालकल्याण संस्था, स्वयंसेवी संस्थांचे जाळे विकसित करणे, समाजप्रबोधन, कार्यकर्ता प्रशिक्षण अशा विविध पैलूंवर ते विचार, लेखन इ. माध्यमांतून समाज प्रबोधन करत राहिले. एखादे क्षेत्र आयुष्यभर वाहून घेऊन त्यात मूलभूत स्वरूपाचे जे योगदान देता येईल ते देत राहिल्याने 'महाराष्ट्रातील बालकल्याणाचे भीष्माचार्य' ही उपाधी त्यांच्यासाठी सार्थ ठरते. हे सर्व करून ते ज्या स्थितप्रज्ञ वृत्तीने उत्तरायुष्यात राहिले ते केवळ अनुकरणीय होय!
 डॉ. शरच्चंद्र गोखले यांचा मला सहवास लाभला तो सन १९८० पासून ते त्यांचे दु:खद निधन होईपर्यंत. मी त्यांच्याबद्दल प्रथम ऐकलं तेव्हा मी कोल्हापूरच्या रिमांड होमचा विद्यार्थी होतो. ते ज्या काळात पुणे रिमांड होमचे अधिकारी होते त्या काळातील काही मुले रिमांड होमचे काळजीवाहक अधिकारी झाली. त्यांच्या मतानुसार, डॉ. गोखले म्हणजे माणुसकीचा पाझर. रिमांड होम, अनाथाश्रमामधील लाभार्थी, कर्मचारी, अधिकारी, कार्यकर्ते यांच्याबद्दल त्यांच्या मनात अकृत्रिम जिव्हाळा, प्रेम, आपलेपणा भरलेला असायचा. महाराष्ट्रातील बालकल्याण संस्था हे त्यांचं विस्तारित सामाजिक कुटुंब होतं. कुणाचाही निरोप समारंभ असो, डॉ. गोखले दत्त! फक्त कळणं एवढंच त्यांना पुरं असायचं.
 संस्थेतील मुला-मुलींविषयी त्यांना अपार माया असायची. आपली मुलं मोठी झाल्याचा अभिमान असायचा. डॉ. गोखले यांच्याकडे मनुष्यसंग्रहाची मोठी विलक्षण कला असायची. 'हो जायेगा बेटा' असा एक उमदेपणा सतत

निराळं जग निराळी माणसं/८०