पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/84

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वेश्यांना 'माणूस' बनवणारी आई : विजयाताई लवाटे

 वेश्या व त्यांची मुले यांच्या संबंधातील प्रश्नांची जाणीव मला सन १९८५-८६ च्या दरम्यान झाली. कोल्हापूरच्या बालकल्याण संकुलामार्फत आम्ही अर्भकालय व अनाथ विद्यार्थी वसतिगृह सुरू केलं होतं. त्या वेळी काही वेश्यांची मुलं आमच्या संस्थेत होती. त्या वेळी संस्थेत असलेल्या ज्या मुलांचे पालक आहेत, त्यांनी संगोपन खर्चात आपल्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे साहाय्य करावं म्हणून आम्ही एक पालक सभा योजली होती. सभेत पालकांनी महिन्याला एक रुपया द्यावा, असे आवाहन केलं होतं. पालकांचं हे साहाय्य 'संगोपनात पालक सहभाग' या तात्त्विक भूमिकेची प्रतीकात्मक कृती होती. दुसऱ्या दिवशी गफूरची आई शंभर रुपये घेऊन आली. म्हणाली, "हे या महिन्याचे माझे पैसे." मी म्हटलं, "एका मुलामागे एक रुपया द्यायचं ठरलंय ना?" तशी गफूरची आई म्हटली, "संस्थेतील सर्व मुलं माझीच हाय. म्हणून शंभर दिलंत." "नको, एकच रुपया द्या" म्हटल्यावर म्हटली, "आख्खी रात्र जागून मिळवलंय...मुलांसाठी." मी सर्द झालो. "माझ्या घामाचा पैसा हाय...नाय नाही म्हणायचं." मी निरुत्तर होतो. पण त्या क्षणी शासनाच्या सांगण्यावरून केलेलं हे मदतीचं आवाहन मी मागं घेतलं.
 या माझ्या जाणिवेपेक्षा अधिक गंभीर केलं ते विजयताई लवाटे यांच्या जीवन व कार्याने. सन १९९० च्या दरम्यान आमच्या 'वात्सल्य बालसदन' अर्भकालयाला जर्मनीच्या तेरेदेस होम्स या संस्थेकडून अर्थसाहाय्य मिळू लागलं होतं. ही संस्था महाराष्ट्रातल्या अनेक अनाथ, निराधार मुले, मुली, महिलांच्या संगोपन व पुनर्वसन कार्याला मदत देत होती. अशा संस्थांच्या कार्यकर्त्यांचं

निराळं जग निराळी माणसं/८३