पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/86

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आजार, बाळंतपणामुळे मिळकत बंद झाली तरी खर्च ठरलेला...या चक्रव्यूहात येणं माहीत असतं, बाहेर जाणं मरणानंतरच! ठेवलेला नवरा, भाऊ, 'आमचा माणूस' त्यांच्या जीवनाचा आधार असतो. पण त्यांच्याकडून फसवलं जाण्यानं त्यांचे हादरणं न भरून येणारं! पण तरी धंदा सुटत नसतो. पदरी पोर असेल तरी आशेनं जगायचं. नाहीतर सारी जिंदगी रामभरोसे!
 कौटुंबिक कारणामुळे विजयाताईंना मुंबई सोडून पुण्यास यावं लागलं. इथं पुनश्च हरिओम. घर, नोकरी, संसार साऱ्याचा शोध...नवा बोध! सन १९६३ ला त्यांना पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य खात्यात पूर्वानुभवावर नोकरी मिळाली. फोरास रोड, कामाठीपुराऐवजी बुधवार पेठ इतकाच काय तो फरक; पण इथं त्यांनी वेश्यांबरोबरच्या मुला-मुलींसाठी काही करता येईल का म्हणून प्रयत्न सुरू केले. सुरुवातीस त्यांनी वेश्यांची मुलं-मुली त्या वस्तीच्या वातावरणातून मुक्त व्हावीत, शिकावीत, त्यांच्या कोवळ्या मनावर तेथील वातावरणाचा परिणाम होऊ नये म्हणून ती मुलं अनाथाश्रम, रिमांड होम, महिलाश्रमामध्ये ठेवण्याचे प्रयत्न केले; पण दाताच्या कण्या करूनही त्यांना वाटाण्याच्या अक्षताच मिळत. जी मुलं, मुली ठेवली ती तिथं रुळेनात. पळून येत. घरी आली की, संस्थेत जाण्यास नाखूश असत. कारण तिथं त्यांना कोणी समजून घेत नसे. मग 'सर्वेषा सेवा संघ' संस्थेच्या मदतीनं गाडीखान्याजवळील एका धर्मशाळेची जागा घेऊन बालवाडी सुरू केली. मुलं शिकू लागली. मग स्वतंत्र वसतिगृहाची गरज भासू लागली. म्हणून आकुर्डी इथं वसतिगृह सुरू केलं. ती तारीख होती १३ जुलै १९७९. चंद्रकांत काळभोर यांची बखळ म्हणून परिचित असलेली आकुर्डीची खंडोबाच्या माळावरील ही जागा म्हणे जनावरांचा गोठा होता. पुढे वसतिगृह विंचवाच्या बिऱ्हाडाप्रमाणे अडचणीमुळे, अधिक सुविधा मिळाव्यात म्हणून उरळी, पौंडजवळ भुमूक, केडगाव बेट अशा ठिकाणी स्थलांतरित करावं लागलं. सन १९८४ ला 'सह्याद्री' मासिकातून विजयाताईंच्या कार्याची माहिती सर्वदूर पोहोचली व काही समाजकंटकांच्या मनात ही संस्था बळकवायची दु:स्वप्नं निर्माण झाली व त्यांनी या संस्थेचे धाकदपटशाने अपहरण केले. विजयाताई या साऱ्या अनपेक्षित प्रकारांनी हादरणं स्वाभाविक होतं. ते सारं केडगाव बेटला पाहताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला नि त्या कोसळल्या.
 पण काही काळच. 'बचेंगे तो और लडेंगे' म्हणत त्यांनी 'वंचित विकास' संस्थेच्या मदतीनं 'निहार' सुरू केलं. पण यश त्यांची नेहमी शिकार करत राहिलं. इथं मतभेद झाले. गैर पटेना. त्यांनी संस्था सोडणं पसंत केलं. त्या सन

निराळं जग निराळी माणसं/८५