पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/95

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे नि तुमच्याकडे पैसे आहेत." 'बाप दाखव नाही तर श्राद्ध कर' अशी त्यांची स्वत:ची अशी कार्यशैली आहे. बरं दादांची चिकाटी अशी की, 'आग्या वेताळ'...एकदा का तो तुमच्या पाठकुळीवर बसला की झडती घेऊनच मुक्ती. त्यामुळे माहीत असलेले लोक दादांचा शब्द प्रमाण मानतात नि ते मागेल ते साहाय्य करतात. ही असते या माणसाची सचोटी, पारदर्शिता नि प्रतिबद्धताही! त्यामुळे रमाकांत तांबोळी सध्याच्या संस्थेतून केव्हा बाहेर पडतात, यावर अनेक संस्था डोळा ठेवून वेटिंग करत असतात (खरं तर दबा धरून बसलेल्या असतात).
 या माणसाच्या कामाची सुरुवातच मुळी तपश्चर्येनं झाली. सेवादल, स्काऊटसारख्या संघटना कुमार, किशोर, युवकांना त्यांच्या घडणीच्या काळात त्यांना काही देतात. तसंच यांनाही त्यांनी दिलेलं. ती शिदोरी घेऊन त्यांनी समाजकार्य करायचं बालपणीच ठरवलेलं. पदवीधर झाले नि त्यांना एम.एस.डब्ल्यू. करायचं होतं. त्या वेळी एम.एस.डब्ल्यू. करू इच्छिणाऱ्यांना कार्यक्षेत्रीय पूर्वानुभवाची (फिल्ड एक्सपीरियन्स) अट होती म्हणून ते अहमदनगरच्या रिमांड होममध्ये कार्यानुभव म्हणून सेवा करायला गेले. तिथे डॅडी लोणकर नावाचे गृहस्थ तेव्हा ती संस्था पाहात. त्यांनी तांबोळीसारख्या पदवीधर युवकाला चपराशासारखं आठ दिवस व्हरांड्यातील बाकावर अकारण वाट पाहत तिष्ठत ठेवलं. यांनी पण ठरवलेलं...'लढल्याशिवाय हरणार नाही'. डॅडी हरले, दादांनी सलामीलाच युद्ध जिंकलं...एखादा अपवाद वगळता त्यांनी आयुष्याची सर्व युद्ध जिंकली ती आपल्या कर्मठशील चिकाटीनं.
 सन १९५७ मध्ये त्यांनी अहमदनगरच्या रिमांड होममध्ये उमेदवारी केली. त्या बळावर त्यांना बारामतीच्या रिमांड होमनं बोलावून घेतलं. तिथं दादांनी त्या रिमांड होमचा कायाकल्प केला. रजेच्या कालावधीत काम करायला गेले नि कायम झाले. असं क्वचित घडतं. दादा जाईपर्यंत ते रिमांड होम बारामती, दौंडच्या परीघात घुटमळत होतं. त्यांनी त्या संस्थेची कार्यकक्षा रुंदावून, इंदापूर, पुरंदर, फलटणच्या मुलांना लाभार्थी केलं. तिथल्या रिमांड होमला इमारत नव्हती. इमारत बांधली. स्वत:च्या इमारतीत रिमांड होम चालवणाऱ्या त्या काळच्या मोजक्या संस्थेत बारामतीची गणना होऊ लागली ती कुणा एका कुटुंबामुळेच नव्हे, तर एका अधिकाऱ्याच्या सेवाभावामुळे. त्या जोरावर ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये गेले व एम.एस.डब्ल्यू. झाले. 'ठरवाल ते तडीस न्या' हे त्यांच्या कामाचं ब्रीद वाक्य बनलं.
 डॉ. शरच्चंद्र गोखले यांच्या संशोधन संस्थेत काही काळ प्रकल्पाधिकारी म्हणून ते कार्यरत होते; पण माणसात रमणाऱ्या या माणसास कागद चिवडत

निराळं जग निराळी माणसं/९४