हे पान प्रमाणित केलेले आहे.

गंभीरपणे करायला हवा, नाहीतर उद्यापरवा, नजिकच्या भविष्यकाळात पक्षांचे अस्तित्वच संपुष्टात येईल. सत्ता अधिकाधिक केंद्रित होईल, अरिहार्यपणे भ्रष्टही होईल. बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीमुळे कागदोपत्री तरी ही केंद्रीकरणाची प्रक्रिया पूर्ण झालेलीच आहे. पण ती झालेली नाही असे वाटणे हा इंदिराजींच्या धक्कातंत्राचा विजय आहे. या विजयाच्या चमचमाटात निवडणुका होत आहेत. त्यामुळे लोकशाहीवाद्यांची अवस्था आणखीनच नाजूक आणि चमत्कारिक झालेली आहे. जळत्या वर्तुळातून सूर मारून पलीकडे जाण्याचा खेळ सर्कसमध्ये आपण नेहमी पाहतो. लोकशाहीवाद्यांना हा खेळ करून दाखवायचा आहे. सूर मारणाऱ्या कसरतपटूइतकेच कौशल्य व जागरुकपणा यासाठी आवश्यक आहे. जरा इकडे तिकडे झाले तरी अंग भाजून निघण्याची शक्यता आहे. तेव्हा आणीबाणी शिथिल झालेली असली तरी उठलेली नाही याचे भान ठेवूनच मिळालेल्या संधीचा सर्व लोकशाहीवाद्यांनी लाभ उठवला पाहिजे. मागच्या चुका कटाक्षाने टाळल्या आणि नवीन केल्या नाहीत तरच काही पदरात पडण्याची शक्यता आहे. नाहीतर आणीबाणीची टांगती तलवार पुन्हा कोसळण्याची भीती आहेच.

 यादृष्टीने लोकशाहीवाद्यांनी करावयाचे पहिले कार्य म्हणजे आपली जनमानसात असलेली ‘विरोधी पक्ष' ही प्रतिमा पुसून टाकणे, हे होय. राज्यकर्त्यांचा भडीमारी एकतर्फी प्रचार याला मुख्यत्वे कारणीभूत असला तरी विरोधी पक्षांच्या गेल्या दहा-पंधरा वर्षातील वागणुकीकडे, धोरणांकडे दोषाचा वाटा अगदीच नाही असे म्हणता येणार नाही. आपण नवनिर्माणासाठी उभे आहोत ही प्रतिमा आजवर जरा विरोधी पक्षांना-आता होऊ घातलेल्या प्रतिपक्षाला ठसवता आलेली नाही सत्ताधाऱ्यांना सर्वात अधिक भय अशा स्वतंत्र, स्वयंभू प्रतिमेचे असते आणि ती जराही कुठे निर्माण होऊ लागली तर सत्ताधारी सर्व साधनांनिशी ती तोड़नमोडून टाकण्यास मागेपुढे पाहात नाहीत. गेल्या पंचवीस वर्षांत प्रथमच जयप्रकाशांच्या आंदोलनामुळे प्रतिपक्षाची अशी एक स्वतंत्र प्रतिमा तळामुळापासून निर्माण होऊ पाहत होती. आणि याचेच पर्यवसान शेवटी आणीबाणी घोषित होण्यात झाले. कारण अल्पसे का होईना, नवनिर्माण आंदोलन हे जनतेतून उठलेले, खालून वर आलेले एक जीवंत आव्हान होते. ते असंघटित व उद्रेकी स्वरूपाचे होते, बिहार व्यतिरिक्त इतर कुठे ते फारसे पसरलेही नव्हते, हे खरे. पण तरी ते केवळ नकारात्मक नव्हते. सत्ताबाजीने निदान सुरुवातीला तरी पछाडलेले नव्हते. 'नया देश बनायेंगे' अशी विधायक नवनिर्मितीची प्रेरणा त्यामागे होती व जयप्रकाशांच्या समाजवादी–सर्वोदयी पूर्वपरंपरेमुळे समाजातील अगदी खालच्या स्तराला स्पर्श करण्याचा त्यात प्रयत्न होता. जयप्रकाशांनी तरुणांना शाळा-कॉलेजांवर बहिष्कार कायला सांगितला, तो या स्तरांत जागृतीचे काम त्यांनी करावे म्हणून.

नवनिर्माण आणि लोकशाही । १४७