हे पान प्रमाणित केलेले आहे.


जसलोक-जत्रा



 पंतप्रधान मोरारजी देसाई जयप्रकाशांच्या भेटीसाठी ‘जसलोक'मध्ये आले असता चंद्रशेखर, मधू लिमये, एस्. एम्. जोशी ही मंडळी अनुपस्थित राहिली, ही घटना थोडी तपशिलात जाऊन पाहाण्यासारखी आहे. या अनुपस्थितीचे कारण काय असावे ? जयप्रकाशांच्या निधनाचे चुकीचे वृत्त लोकसभेला देऊन मोरारजीभाईंनी जी लाजिरवाणी चूक केली, तिचा निषेध करावा, याबद्दलची आपली चीड व्यवत करावी, म्हणून हे तिघेजण लांब राहिले, मोरारजी असेपर्यंत जसलोककडे फिरकले नाहीत, असे एक कारण दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांतून देण्यात आले होते. असे जर असेल तर त्यात काहीच अयोग्य व टीका करण्यासारखे नाही. मोरारजी म्हणजे अनुभवी व कसलेले प्रशासक. त्यांच्या हातून एवढी मोठी घोडचूक व्हावी हे खरोखरच आश्चर्य आहे. दोषी असतील त्यांना शासन घडले तरी या चुकीमुळे जनता-सरकारची झालेली बेअब्रू काही पुन्हा सावरता येत नाही. शिवाय जनता पक्षाला पितृस्थानी असणाऱ्या जे. पीं.बाबतच हा प्रमाद घडून येणे, हे आणखीच दुर्दैव म्हटले पाहिजे. यामुळे एस्. एम., चंद्रशेखर यांच्यासारखी जे. पींशी निकटचे भावनिक संबंध असलेली मंडळी व्यथित झाली, प्रक्षुब्ध होऊन त्यांनी मोरारजींना जाणवेल अशा पद्धतीने आपला निषेध-राग नोंदवला, यात अस्वाभाविक काहीच नाही. अशी तीव्र प्रतिक्रिया न उमटणेच खरे म्हणजे अस्वाभाविक होते. पण नंतर मुख्यमंत्री श्री. शरद पवार यांना या घटनेबाबत जो खुलासा वृत्तपत्र-प्रतिनिधींना दिला आहे, तो फारच चमत्कारिक व जनता-नेत्यांचा एकूण भोंगळपणा आणखीच उघड करणारा आहे. हा खुलासा वाचल्यावर मोरारजींच्या ठिकाणी समजा चंद्रशेखर किंवा अन्य कुणी जनता-नेते असते, तरी ही किंवा अशीच दुसरी एखादी चूक त्यांच्याकडूनही झाली नसतीच, असे खात्रीपूर्वक काही सांगता येत नाही. खुलासा विनोदी आहे. तो मुळातूनच वाचण्यासारखा आहे. मुख्यमंत्री वृत्तपत्र-प्रतिनिधींना सांगतात -

 'सर्वश्री चंद्रशेखर, मधू लिमये, एस्. एम्. जोशी, रामधन, कृष्णकांत आणि बिहारचे मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांनी पंतप्रधान श्री. देसाई यांच्या भेटीवर

निर्माणपर्व । २००