हे पान प्रमाणित केलेले आहे.



प्रतियोगी सहकारिता



 जे घडले ते अनाकलनीय आहे, तर्काला न जुमानणारे आहे. आपण इतक्या प्रचंड मताधिक्याने निवडून येऊ याची इंदिरा गांधींना तरी कल्पना होती का ? आता त्या ठामपणे म्हणत आहेत की, ३५० जागांची आपली अपेक्षा होतीच. त्यांनी असा दावा करणे या विजयाच्या वातावरणात कुणी गैरही मानणार नाही. पण मग रायबरेली व मेडक या दोन्ही मतदार संघात उभे राहण्याचा द्राविडी प्राणायाम त्यांनी कशासाठी केला ? तेव्हा त्यांनाही हा प्रचंड विजय म्हणजे आश्चर्याचा गोड धक्काच असला पाहिजे. इतर राजकीय नेत्यांचे, वृत्तपत्रांचे अंदाज चुकले, हेही मनमोकळेपणाने मान्य करायला हरकत नाही. १९७७ ला ते जसे चुकले तसे ते आताही चुकले. ७७ मध्ये मतदान झाल्यावरही जनता नेत्यांना आपल्याला तसे बहुमत मिळेल अशी निकाल लागपर्यंत अपेक्षा नव्हती. इंदिरा गांधी पडतील, काँग्रेस उत्तरेत इतकी भुईसपाट होईल असा अंदाज कुणालाच अगोदर आला नाही. इंदिरा गांधींनाही आपण निवडून येणार नाही, आपल्या पक्षाचा पराभव होईल, अशी थोडीफार जरा शंका आली असती तरी त्यांनी निवडणुका घेण्याचे या नाही त्या कारणास्तव टाळलेच असते. त्यांच्या सत्तेला त्या वेळी कुठलेही आव्हान वगैरे निर्माण झाला नव्हते. लाख दोन लाख लोक तुरुंगात सडत पडले असते तरी त्याची त्यांना पर्वा नव्हती व देशही त्यामुळे काही बंड करून उठण्याच्या तयारीत वगैरे नव्हता. त्यांना आपण यशस्वी होऊ असे त्या वेळी वाटले म्हणूनच त्यांनी निवडणुका त्या वेळी जाहीर केल्या. पण मतदारांनी त्यांना चकवले. तसेच आताही झाले आहे. फक्त चकणारे बदलले. लाट उलटली. वादळाने दिशा बदलली. त्यावेळी आणीबाणीतील अत्याचारांमुळे लाट उसळली व तिने इंदिरा गांधींना गिळंकृत केले. यावेळी जनता नेत्यांची भांडणे व नंतर आलेल्या चरण-चव्हाण सरकारचा नाकर्तेपणा यामुळे लोकमत क्षुब्ध झाले व या क्षोभाच्या लाटेवर स्वार झाल्या इंदिरा गांधी. जनता पक्षाचा पराभव धोरणात्मक मुद्दयावर झालेला नाही. २८ महिन्यातली वा पक्षाची कामगिरी तशी वाईट नव्हती व एकूण धोरणेही;

निर्माणपर्व । २२०