पान:निवडक अंतर्नाद.pdf/१०२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

"झोपू द्यानं मुकाट्यानं, कावून तरास देता रातचे बेराच्चे? दिवसभर काम करू करू माहं मढं जाते. जीव कसा टणकून जाते... तुमी कावून खेव देता? झोपमोडी करता?" असं म्हणून तिने पुन्हांदा भुईला पाठ दिली. अन् अंगावर चादर घेऊन मळक्या चादरीत गुरफुटून गेली. मग त्याने गोधडीवरच्या आपल्या झोपल्या पोराकडं पाहिलं, ते अस्ताव्यस्त उघडंच पडलं होतं. त्याच्या उघड्या हातापायांवर डासांचं लवकांड भिडून रक्त ओढायच्या कामात गढून गेलं होतं. दुसऱ्या चवथीत जाणाऱ्या पोराचीही तीच अवस्था होती. त्याला आतल्या आत भरून आल्यासारखं झालं. त्यानं पाहिलं, उजवायला आलेली पोरगी तेवढी आपल्या अंगावरच्या चादरीत गुरफुटून झोपली होती. नखही उघडं दिसत नव्हतं. त्याच्यानं ती सुरक्षित होती. तिच्या अंगावरच्या चादरीवर डास बसून होते, पण अंगास काही डसू शकत नव्हते. मोठ्या लोकायचं, नवकरीवाल्या पगारदारायचं एक बरं आस्ते, पंखा लावून झोपतात, पण आपून पंखाबी घेवू शकत नाई. लाडा नवसाची लाईन घेतली घरात, पण पंखा नाई घेवू शकलो. तेवढा पैसाच कधी शिल्लक उरला नाई. पिकपाण्याचा पैसा येते हाती. हंगामाच्या घाती त त्यो सम्दा मांगली भोकं बुजण्यात जुळवाजुळवीतच सरून जाते. मांगला दिसा एकदा बील भरल्या गेलं नाई, तवा लाईनच कट झाली. तवापासून तीबी कशी पुरवून पुरवून वापरावं लागती. जास्ती युनीट जळू नाई. जास्ती बील येवू नाई. म्हणूनसन्या किती काळजी घ्यावं लागती, बील थकलं की लाइनमन लाइन कट करू जातात. मग बसा लागते अंधारा कंधाराचं बोंबलत... त्याने पोराच्या अंगावरची गोधडी बरोबर टाकली. पण गोधडीखालचे दोन्ही पोरं ह्यतपाय झाडाय लागले. गोधडीखाली दम कोंडला असावा, म्हणून सगळीच्या सगळी गोधडी अंगावरून फेकून दिली. झोपेत काहीतरी बडबड केली. तसा विठोबा गवारे चारी अंगाने शहारून उठला. अशी झोपेत पोरं कधी कधी बडबड करतात, बायको वसणावते, तेव्हा तो पार भेदरून जातो... .... सालं माणूस झोपीत बडबड करते, वसणावते... म्हंजी एकदम मुडदाच बोलल्यासारखा वाटते. घरच्या टिनफत्र्यावर तुटक ताटक पावसाचे थेंब पडत होते. बाहेर आभाळ ढगांच्या दाटीत दमकोंडी झाल्यासारखं वाटत होतं... तो उठून बाहेर आला. घनघोर काळोख दायळून आला होता. ग्रामपंचायतीचे रस्त्यावरचे लाइट नेहमीप्रमाणे बंदच होते... त्याच्या अंगावर झिमझिम पावसाचे थेंब फवाऱ्यासारखे आले. तसा तो कतावून गेला. .... अता हे बुझर बटकं आभाळ उडदा-मुंगाच्या आगाईतावर हमखास कोकडा - मव्हा - दह्या आसे रोग पाडणार... पाडणार म्हंजे पाडणार... पुन्हांदा फवारणीसाठी त्या सुभाष झोरेची दाढी धरावं लागणार... हावीटाच्या थैलीवर एकशे वीस रुपये किंमत छापेल व्हती. त्यानं दोनशे-आडीचशेले थैली देली, मालाचा शॉटेज हाये म्हणे, कपाशीच्या थैलीवरबी तसंच. छापेल किंमतीच्या दुप्पट पैसे घेतले. आंब्यातला वरपून घ्यावं तसं आपल्याले... गावातल्या कास्तकारायले वरपून चिरपून घेतलं... ह्यब्रेयची ती तशी झकमारी झाली. आवंदाच्या साली खायापुरतीबी जवारी व्हती का नाई... त्या भगवंतालेच डोळे... भगवंत तरी कुठून देणार हाये ? वावरात आगाईतच निगल नाई. सम्दा कुंदा अन् हराळी जोर माराय लागली... हायब्रीड पेरलं वावर डोळ्यापुढं आलं. इथं एक तर तिथं एक असे कोमटे उगवले होते.... पडते वाटते ते तीन एकर वावर आता बोकांडी! का करावं लागते कोणाले माईत मोडतोड... हायब्रीडचं तीन एकर वावर सारखं सारखं डोळ्यांशी फिरायला लागलं. अन् विठोबा गवारे काळजाला कोरपड झोंबल्यासारखा झाला. डोक्यात चवकर दाटाळून आले. कसंच्या कसं उदास, भकास वाटायला लागलं. घरात परतून यायला लागला तर दारात एक बेडूक ! टुणूक टुणूक उड्या घालत घरात जात होता. त्याच्या तळपायाची आग मस्तकात भिडली. साली बेंडकी घुसायच्या कोणाच्या हांथुरणात अन् उठायचं कोणी भेदरून... त्याने पायात बुट घातले. बेडकाजवळ गेला, अन् दातओठ खाऊन दुनिया चिरडून टाकण्यासाठी द्यावा तसा बेडकावर पाय दिला. चिर्रऽऽ चिर्रऽऽ चिक् आवाज उठला पायाखाली बेडकाचा मूठभर चिखल झाला, तावातावान् तशीच ठोकरून अंगणात फेकली. आत आला, मग मनास असं वाटाय लागलं की बेंडकीच्या जागी साप पाह्यजे व्हता. हातात धरून पिळून चोथा केला आस्ता... सरप माराय पाह्यजे. बेंडकी बिचारी गरीब... तिले मारण्यात काय भूषण ? पोरांचे हातपाय उघडे पडलेले होते. त्याने वाकून पाहिलं. डासांचे ठिपके अंगावर बसून कुरतडत होतेच. कातावून गेला. मस्तकात जणू आग लागली. काय साले आपल्या आंगातलं रगत शोघून घ्यायसाठी एक एक पैदा झाले... रगत आपल्याच अंगातलं चोखून घेणार.... पंखावाल्यायचं आजेबात नाई... बेंडकी हाथुरणात घुसायच्या भितीनं पायाखाली चिरडून मारली. पण मच्छरायचं काय? आसेच डसतात, मग पोरं सोरं बेमार पडतात. तिथं डॉक्टर पुन्हांदा पिळून घेते. कमाई करत रहा अन् भरत रहा डॉक्टरांचे खिसे... काय करावं? मस्तकावर सहज हात गेला तर त्याचं त्यालाच ते गरम लागलं. मग तावातावाने चुलीजवळ गेला. चुलीत गोवऱ्या कोंबल्या. तुरकाट्या कोंबल्या, काडी लावली. धुराचे लोट उठले, मग पुन्हा जळत्या तुरकाट्यावर चिंध्या टाकल्या. सगळ्या घरात धूरच धूर झाला... ....साले सम्देच्या सम्दे धुपटानं मरून पडतात आता. नाईतं जळून जातान... पण काही पळून जातान, पळून जातन ते धुपट सरल्यावर पुन्हांदा घरात येतान, बायको पोरास डसतान... काय करावं? का कायमच अंगाशी धुपट घेवून जागावं? कोंडल्या घरात धुराचा ठसका उठला. तशी बायकोला जाग •आली. धुपट जाणवून ती जोरात दोनदा ओरडली, "धावा धावा ऽऽ आग लागली... आग लागली. " तिची किंकाळी रात्रीच्या शांत पावसाळी काळोखाला कापत गेली, काय झालं? त्याला थोडावेळ कळलंच नाही, पण कळलं तसा तो तिच्यावर कोसळला. तिचं तोंड गच्च गच्च दाबून धरलं. दुसऱ्यांदा तिला ओरडूच दिलं नाही. निवडक अंतर्नाद १०१