पान:निवडक अंतर्नाद.pdf/१०४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

"हे शील त्यानं घरच्या घरीच लावलं. थैल्यावर शिलाईबी घरीच मशीननं मारून घेतलीय." "पण कंपनीचा शिवका अन् कागद व्हते न शिलबंद थैलीच्या तोंडावर?" "बाया म्हणत, त्याच्यातबी एक गोम हाये !” "कोन्ती?" "त्यानं पेरा करेल वावरवाल्याकून रिकाम्या थैल्या इकत घेतल्या... पंचवीस रुपयाची एक... तोंडाशी असणारे कागद संभाळून आणा म्हणत जाय. कंपनीवाल्याकडी थैल्याचा तुटवडा हाये म्हणून त्याह्याले वापीस पाह्यजे म्हणाजाय रिकाम्या थैल्या. " "आस्स?" असं विचारून त्याने गालावर चापट मारली. तिथं डास डसला होता. "हाव! मांगल दिसा चह्यचे रिकामे पुडे नवते का वापस घेत दुकानदार आपल्या गावात... अन् तिच्यात घरी उकळून पियेल चहाचं भुसकट भरून आपल्याले इकत व्हते! तशीच आयडीया केली त्यानं ! रिकाम्या थैलीचे पैसे देऊन त्या इकत घेतल्या... अन् घरची जवारी भरून इकली. सम्दे लोकं बोंबलत व्हते त्याच्या नावानं!” ते बोलणं पहिल्यांदा त्याने सहज ऐकावं तसं ऐकलं. पण नंतर गळ्यापर्यंत चिखलात फसलो, फसवलो गेलो, ही जाणीव त्याला कुरतडून काढायला लागली... आपल्याले नक्कीच भेसळीची थैली देली भडव्यानं! चार रुपये किलोची जवारी सत्तर रुपये किलो देली... आपला सम्दा खानाखराब सत्यानास केला. आता आपलं काई खरं नई... त्याला मस्तक तापल्यासारखं वाटाय लागलं. त्याने हात लावला, चटका लागला, घामही आला होता. तो पुसून काढला. आता करावं लागणार मोड अन् एकदा कास्तकाराच्या मागं मोड लागली की काई खरं नाई. आपणास भेसळीची थैली दिली या विचाराने त्याचं डोकं गच्च झालं. कानात मधूनच कानठळ्या बसल्यागत व्हायला लागलं तर कधी शिट्या ऐकायला येऊ लागल्या... त्याच्या डोळ्यातली झोप पार चिंधीचोळा झाली. त्याची रात झोपलीच नाही. त्याची थोड्याच वेळात गुरफटून झोपली. दिवसभराच्या निंदनाच्या कामाने थकून गेली होती. तो डास मारत जागाच होता. तळमळत होता... पांढरीतलं ढोर तोडलेले कुत्रे अपचन होऊन बेजार झाले होते. पोट दुखत होतं म्हणून वर आभाळाकडे तोंड करून भेसूर विव्हळत होते. त्यांचे आवाज काळजावर चरका उठवत होते... रातकिड्याचे आवाज रात्र घुमवत होते. ओढ्याच्या डबक्यात बेडक्या ओरडत होत्या, ते सगळेच आवाज त्याचं मस्तक झांझरून टाकत होते. मध्येच घराच्या फयावर थडथड पाऊस वाजला, एक हलकीशी सर कोसळून गेली. तिचा गारवा हवेत पसरला, मग भुरुभुरू फवारा मारल्यासारखा पाऊस पत्र्यावर झिरझिरत राहिला. तो बाहेर आला. अंगावर दव थेंब पडावे तसा पाऊस जाणवला. अंगण मात्र मघाशी आलेल्या पाऊस सरीने ओलं झालं होतं. तो पुन्हा गोधडीत येऊन पडला. सकाळी मशिदीत अजान उठली. तसा तो उठून बसला. डोक्यात ज्वारीचं शेत रात्रभर तळमळत होतंच, ती तळमळ आता दुपटीने वाढली. त्याने पाहिलं. बायको पोट पोटाशी घेऊन झोपली होती. मुटकुळा झाली होती. पोरंही अस्ताव्यस्त पसरले होते. तो उठला. पायात वाटर प्रुफचे बुट घातले. पोत्याची खोल डोईवर घेतली, दार ओढून रानवाटेला लागला. पाऊस फार काही पडला नव्हता. पण पायास पेंड लागत होते. बुटाचं वजन वाढवत होते. अन् पायातले बूट सटासट सटकत होते. मागच्या टाचाकडून फतड्क फतड्क वाजत होते. तो कसरत केल्यासारखा अवघडत चालून कंयळून गेला. त्याला रागच आला. तर पायातले बूट उपसून बाहेर काढले. अन् बांधावरच्या कुपाटीत ओळखण ठेवून दडवले. तसाच अनवाणी पायाने लगबग वावराकडे चालायला लागला. पांदीला लागूनच वावर होतं. पहिल्या तोंडाशी मुंगाचा पेरा, मुंग चांगला दणकवून तासी लागला होता. मुगाच्या शेजारी चौफुलीवर पऱ्हाटी... सगळी निघून आली होती. तुरळक तोड्याच्या जागेवर तुरीचे दाणे टोपले होते. तेही निघून आले होते. दोन्ही पिकं ओलांडून झरझर चालत तो ज्वारीच्या शेतात आला. अन् कच्कन पायात बाभळीचा सुळकाटा मोडला. एकदम जिव्हारीच लागल्यासारखा झाला. तो मटकन खाली बसला. त्याने पाहिलं, गहूभर सुळकाटा पायात रुतून बसला होता. त्याने शिवी हासडली. तसाच लंगडत बाभळीच्या झाडाजवळ गेला. दुसरा काटा मोडून हा काटा टोकरला, नखाने उपसला, तर रक्ताची धारच उठली. पायास ओल्या मातीचे पेंड लागले होते. त्यावर रक्त सळसळ झालं. गडी तसाच उभा झाला, लंगडी खेळत ज्वारीचं वावर तुडवायला लागला. तर पायातल्या काटवणाची कळ बरोबर काळजात खोलवर गेली. आचक- विचक तासं दिसत होते. भरीत भर लव्हाळी हराळीचे कोंब सळकून वर उठले होते. हायब्रीडची पेरणी करताना मागून मोघ्याने खत पेरलं होतं. ज्याच्यासाठी पेरलं ते आगाईत त्याजागी उगवलंच नव्हतं, पण तणकटास खत लागून त्यास माज चढल्यासारखा झाला होता. हिरव्यागार तणकयचा विळखा काळीज कापीत होता. खाली बसून, वाकून चालून, सगळं करून त्याने ज्वारीचे कोमटे न्याहाळले. आचक- बिचकच निघाले होते. एक कोमटा इथं, तर दुसरा तिकडं हाता दोन हातावर... ह्या सुभाष झोयानं आपल्या कुणबीकीले कीड लावली भडव्यानं... आता काय खावावं सालभर ? आता हे तीन एकर वावर आपल्या अंगावर पडणार... एवढ्याच पेऱ्यात तीस पोते जवारी झाली आस्ती... आता तीन पोतेबी व्हती का नाई काई सांगता येत नाई.... निवडक अंतर्नाद १०३