पान:निवडक अंतर्नाद.pdf/१२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ज्याचा त्याचा बोधिवृक्ष लक्ष्मण लोंढे अंतर्नादच्या ऑगस्ट १९९५ मधील, म्हणजे पहिल्याच अंकापासून लक्ष्मणझुला हे निसर्ग, विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालणारे ललितलेखनाचे सदर सुरू झाले. पहिल्या अंकातील हा सदराचा पहिला लेख, त्यानंतर दोन संकल्पना एक विचार हा लेख व मग जानेवारी १९९९ मधील या सदराचा शेवटचा लेख. - अगदी अलीकडची गोष्ट. फार दूर नाही, आपल्या माथेरानला गेलो होतो. सुदैवानं माथेरानला अजून बऱ्यापैकी जंगल आहे. भर दुपारी जंगलात फिरायला गेलं तरी सूर्यकिरणांचा ताप न लागता झाडांच्या सावलीखालून चांगलं मैलोन् मैल फिरता येतं. शिवाय वर डांबरी रस्ते केल्यामुळे आणि पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांना बंदी केलेली असल्यामुळे शहरी जीवनापासून दूर आल्याचा आनंद माथेरान अजूनही देतं. त्यातून ऑफ सीझन गेलं तर फारशी गर्दीही नसते. तर अशीच टळटळीत दुपारची, जवळ जवळ माध्यान्हाचीच वेळ होती आणि मी एका पॉईंटपाशी पोचलो होतो. चालण्याचे बऱ्यापैकी श्रम झालेले होते. त्यामुळे त्या पॉईंटवर थोडा वेळ विश्रांती घेत बसायचं ठरवलं. तो पॉईंट महत्त्वाच्या पाच-दहा पॉईंट्सपैकी एक नव्हता, त्यामुळे पॉईंटपाशी चहाचं दुकानसुद्धा नव्हतं. उन्हाळा असला तरी रविवार किंवा जोडून सुट्टी नसल्यामुळे आजूबाजूला एकही माणूस नव्हता. मी पॉईंटच्या अगदी कडेवरच्या एका मोठ्याशा खडकावर जाऊन बसलो. खडकाच्या बाजूलाच एक मोठा डेरेदार वृक्ष होता आणि त्याची गर्द, काळी सावली खडकावर पडली होती, पण हा सावलीचा भाग सोडला तर मात्र सर्वत्र रणरणतं ऊन पडलं होतं. त्याचा ताप डोळ्यांनाही जाणवत होता. तळपता सूर्य आसमंत भाजून काढीत होता. विटांची भट्टी पेटलेली असावी तशी चारी बाजूनं आग पसरली होती. खडकापासून चार पावलांवर खाली कडा तुटला होता आणि पलीकडे खाली खोल दरी होती. दरीत छोटीशी चार झोपड्यांची वस्ती असलेलं गाव दिसत होतं. त्यातल्या एका झोपडीतील गृहलक्ष्मी पोटाची आग भागविण्यासाठी स्वयंपाक करीत असावी. कारण त्या एका झोपडीच्या छपरातूनच फक्त निळसर धुराची एक वक्र रेषा दरीत वर चढताना द होती. बाकी सर्वत्र चिडीचिप होतं. दरीतल्या आकाशात एक घार तरंगताना दिसत होती. मी डोळे मिटून खडकावर उताणा झालो. एका अनुभूत मानसिक शांततेचा अद्भुत आस्वाद मला मिळत होता. वाटत होतं, मीही जणू त्या चित्राचा भागच बनलोय आणि ही भावना अतिशय सुखद होती. थोडावेळ मग मी मनाशी चाळा केला. माझ्या आजूबाजूला पसरलेला तोच भूभाग रात्रीच्या चांदण्यात कसा दिसेल याचं मी मनात चित्र रेखाटू लागलो. पहिली गोष्ट म्हणजे उन्हाची तल्खली पार नाहीशी झालेली असेल. अंगावर शिरशिरी आणणारा गारवा असेल. आता दुपारच्या वेळी वार पडलेला होता, पण रात्री कदाचित गार वारा वाहत असेल. आता नीरव शांतता होती. रात्री रातकिड्यांचे आवाज असतील. शीतल चांदण्याची चंदेरी चादर सर्व चराचरावर पसरलेली असेल. त्या रुपेरी वातावरणात दूरचे डोंगर अधिकच परके, अधिकच गूढ दिसत असतील. सारं वातावरण काव्यमय, मोहक वाटत असेल आणि कदाचित त्या वातावरणाशी संपूर्णपणे विसंगत असं एक नाट्यही त्याच वेळी तिथे घडत असेल. जंगलातली श्वापदं त्या वेळी शिकारीसाठी बाहेर पडतील. रात्रीच्या काळोखातही भक्षकाला आपलं भक्ष्य नेमकं दिसेल, त्याचा आवाज ऐकू येईल. त्याचा गंध येईल. जीवनमरणाचं एक थरारनाट्य खेळलं जाईल. भक्ष्य होणारा छोटा प्राणी जीवाच्या आकांतानं पळण्याचा प्रयत्न करील, पण पुढच्या काही क्षणांत शिकारी लांडग्यानं आपले दात त्याच्या मानेत घट्टपणे घुसवलेले असतील. त्याची एक आर्त किंकाळी खालच्या दरीत घुमेल मृत्युनं झडप मारलेल्या त्या जीवाची आर्त किंकाळी मला खरोखरच ऐकू आली. मी माझ्या दिवास्वप्नातून जागा झालो. शरीर चांगलंच सुस्तावलं होतं. डोळ्यावर आलेली झापड काही जात नव्हती. मी थोडी कुशी बदलली, वरच्या पर्णसंभारातून उन्हाचा एखादा चुकार कवडसा डोळ्यांवर येत होता. तो टळेल अशा स्थितीत शरीराची पुनर्स्थापना केली. काही काळापुरेसं मन पूर्णपणे रिकामं झालं. पण मनच ते - ते स्वस्थ थोडंच बसणार ? आता मनानं दुसराच चाळा सुरू केला. वाटलं, आता उन्हाळा आहे, धुंवाधार पावसात हेच डोंगर कसे दिसतील ते पाहावं. आणि पाहता पाहता समोरचा डोंगर हिरवागार झाला. धूळ बसलेल्या वनश्रीचा चेहरा पहिल्या पावसानं कसा स्वच्छ, तजेलदार दिसू लागला. उन्हाच्या तकाट्यानं थकलेली, म्हातारी निवडक अंतर्नाद ११