पान:निवडक अंतर्नाद.pdf/१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

झाल्यासारखी वाटणारी झाडं पाण्याचा पहिला घोट मिळताच चैतन्यानं तरारून उठली. कोरड्या आणि सुट्या सुट्या झालेल्या मातीच्या ढेकळांना पाण्याच्या प्रेमाचा ओलावा मिळताच ती पुन्हा एकदा जमिनीशी घट्ट बांधली गेली. मे महिन्याच्या सुट्टीत उन्हाळ्यामुळे हवेत रानोमाळ उनाडक्या करायला गेलेले धुलीकण पुन्हा जमिनीच्या कुशीत शिरले आणि हवा स्वच्छ झाली. आता दरीतून सुसाटपणे घोंघावत फिरणारा वारासुद्धा त्यांना हवेत खेळायला बोलावू शकत नव्हता. पावसाची संततधार सुरू झाली. झाडापानांवरून ओघळून पाण्याचे थेंब जमिनीवर उड्या घेऊ लागले. त्यांच्या टपटप ध्वनीनं साच्या निसर्गदृश्याला एक सुरेख पार्श्वसंगीत लाभलं. आता वाऱ्याचा जोर वाढला. त्यानंही आपला स्वर या पार्श्वसंगीतात मिसळून दिला. वाऱ्याच्या वाढत्या जोरामुळे झाडांनाही या संगीत जलशात भाग घ्यावासा वाटला. पण त्यांना तर गाता येत नव्हतं. म्हणून त्यांनी शरीराची घुसळण करीत पिंगा घालायला सुरुवात केली. कविवर्य पाडगावकरांनी मराठीला बहाल केलेल्या एका सुंदर शब्दात वर्णन करून सांगायचं तर पावसाच्या 'धारानृत्या' ला सुरुवात झाली. माझं मनही नाचू लागलं. आणि तेवढ्यात कडाडकन् ढगांच्या पाठीवर विजेचा आसूड ओढला गेला. ढगांनी एवढा आक्रोश केला की मी ताडकन भानावर आलो. विश्वास ठेवा अगर ठेवू नका, त्या वेळी माझ्या अंगावर पाण्याचे चार थेंब पडलेले होते! पुन्हा शरीरानं कुशी बदलली, मनानं चाळा बदलला. आता हिवाळ्यातल्या पहाटे खालच्या दरीत धुकं कसं साचत असेल, त्याच्यामुळे खालची दरी अदृश्य होऊन आपण हवेत तर तरंगत नाहीना असा भास कसा होत असेल, सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबर धुक्याचा पडदा कसा विरळ विरळ होत जात असेल आणि गवताच्या पात्यांवरच्या दवबिंदूंना पहिला सूर्यकिरण कोणतं तेज बहाल करेल याचा विचार माझं मन करू लागलं, वेळ कसा निघून गेला समजलंच नाही. सेकंद, मिनिटं, तास आपल्या पावलांचा थोडाही आवाज न करता माझ्या अंगावरून निघून गेले. त्यांनाही समजलं, माझी भावसमाधी लागलेली आहे आणि कोणालाही समाधीतून जागं करायचं नसतं इतपत सभ्यता काळही पाळतो! त्या दीड-दोन तासांच्या काळात माझ्या मनातले नेहमीचे छोटे-मोठे राग-लोभ, द्वेष काळज्या पार नाहीशा झाल्या होत्या, मी गुंतवलेल्या शेअर्सच्या किंमती उद्या कोसळणार तर नाहीत ना, कालपरवा माझ्या छातीत दुखत होतं त्याचा हार्ट अॅटॅकशी तर संबंध नव्हता ना, उद्या संध्याकाळी माथेरानहून परत जायला निघेन त्यावेळी नेरळला मला गर्दीत चढता येईल ना, घरी पोचेन तेव्हा लिफ्ट चालू असेल ना, मला बिल्डिंगच्या आठ मजल्यांचे जिने चढ़ावे लागणार नाहीत ना, मुलाला चांगल्या कॉलेजात अॅडमिशन मिळेल ना अशा प्रकारचे जे अनेक विचार माझं अस्तित्व कायम कुरतडत असतात त्या विचारांना यावेळी मनात बिल्कुल थारा नव्हता. मन आनंदाच्या एका उच्च पातळीवर गेलं होतं. आनंदाचे डोही, आनंद तरंग | आनंदचि अंग, आनंदाचे ॥' ह्या अभंगाचा १२ निवडक अंतर्नाद रेखाटन दीपक संकपाळ

मला अर्थ समजला एवढंच नव्हे तर मी त्याचा चवक अनुभव घेतला. आपल्या दैनंदिन जीवनातल्या अशाश्वत पण भेडसावणाऱ्या विचारांना विसरून आपण जेव्हा शाश्वताच्या विचारात गढून जातो तेव्हा फक्त आनंदच असतो हे ज्ञान मला त्या तासा दोन तासांत झालं. मी म्हणतो, माथेरानच्या त्या अप्रसिद्ध पॉईंटवरच्या त्या वृक्षाला मी माझा बोधिवृक्ष का म्हणू नये? गयेला जाऊन बोधिवृक्षाचं दर्शन घेणं, त्याला फेऱ्या मारणं हे मी कधीच केलेलं नाही. पण भगवान बुद्धांना जिथे दर्शन झालं त्या बोधिवृक्षाचं दर्शन घेण्यापेक्षा प्रत्येकाला आपापला बोधिवृक्ष सापडणं हेच अधिक महत्त्वाचं नाही का? (ऑगस्ट १९९५)