पान:निवडक अंतर्नाद.pdf/१३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काढेल हे सांगता येत नव्हतं. म्हणून वॉचमन त्याला निरंतर साखळीत बांधून ठेवत असे. रात्री तो मोकळा होई. कुत्र्याला सतत बांधून ठेवला, की तो चिडखोर आणि कडक होतो असं सांगतात. हे सांगणं बरोबर आहे, हे रॉकीच्या बाबतीत सिद्ध व्हायला लागलं. तो मोठा व्हायला लागला आणि तेवद्यच कडकही त्याला सांभाळणं अवघड व्हायला लागलं. शिवाय, वॉचमन दिमतीला असताना प्रश्न फारसा गंभीर वाटत नव्हता; पण वॉचमन नोकरी सोडून गेला आणि प्रश्न लगेच गंभीर बनला. कुत्र्याला सोबत नेणं वॉचमननं पसंत केलं नाही. रॉकी राहिला आणि त्याचं काय करायचं, हा प्रश्न मला भेडसावू लागला. कारण अपार्टमेंटचा मी अध्यक्ष होतो आणि अपार्टमेंटमधल्या ऑफिसवाल्यांच्या अंगावर तो धावून जायला लागला, प्रसंगी चावेही घ्यायला लागला. एक दिवस त्याला दूर कुठेतरी सोडून येणं अपरिहार्य ठरलं, आणि त्या उद्योगाला मी लागलो. नवीन वॉचमन त्या कुत्र्याला सांभाळायची जबाबदारीच घ्यायला तयार नव्हता. तसा त्यानं प्रयत्न केला तेव्हा त्याच्या ह्यताचा कुत्र्यानं लचकाच काढला, त्याच्यापासून सुटका करून घेण्यासाठी एके दिवशी मी त्याला मोटारीत घातला आणि लांब भूगावकडे घेऊन गेलो. तिथे त्याला गाडीतून बाहेर काढला. गळ्यातली साखळी काढून घेतली. तो काही क्षण बावरला, गाडीच्या मागे तो पळून येऊ नये, म्हणून मी गाडी तशीच पुढे पौडच्या दिशेने पळवली, खूप पुढे गेल्यावर वळवून पुण्याकडे यायला निघालो. एकूण त्याची पीडा दूर केली या समाधानात मी होतो, तर दुसऱ्या दिवशी तो अपार्टमेंटमध्ये हजर! मी आश्चर्याने थक्क! चालून चालून तो पेंगाळला होता. एक कोपरा धरून तो मुकाट बसून राहिला. काय करावं, मला कळत नव्हतं, जित्या जागत्या माणसाला मी भूगावला सोडलं, असतं तर पत्ता न सांगता, कोणाशीही विचारपूस न करता, एखादा नवखा डेक्कनवर नेमक्या पत्त्यावर येणं केवढं अवघड होतं! मुळात चांदणी चौकात पोह्येचल्यावर केवढेतरी रस्ते फुटत होते! पाषाण रोड होता, तो औंधकडे जात होता, एन. डी. ए. रोड भलतीकडे जात होता. कात्रजचा रस्ता वेगळाच होता आणि पुण्याकडे येणारा पौड रोड वेगळाच होता. पुढे या रस्त्यांना अनेक फाटे फुटत होते. कुठलीही विचारपूस न करता हा रॉकी आलाच कसा? याचं मला नवल वाटत होतं. मी त्याच्याकडे रागाने पाहत होतो आणि तो दीन होऊन दयेची जणू भीक मागत होता. माझा राग मावळला आणि त्याला सोडून देण्याचा विचार मी आधी सोडला. त्याला आहे त्या परिस्थितीत कसा सामावून घ्यायचा, त्याला कोणतं ट्रेनिंग द्यायचं, या उद्योगाला मी लागलो आणि कालांतराने त्यात यशस्वी झालो, तो आता अपार्टमेंटमध्ये रुळला. कोणाला चावेल ही भीती नष्ट झाली. तो आमच्यापैकी एक झाला. रात्री तो जागा असे. चोरा-चिलटाचं भय आम्हांला राहिलं नाही. त्याच्या भरवशावर आम्ही आणि आमचा वॉचमन निश्चित झालो. दिवस जात राहिले. कॅलेंडरची पानं उलटत गेली. कॅलेंडर्स बदलत गेली अनेक वॉचमन आले आणि गेले. रॉकी अपार्टमेंटमध्येच होता. २०१४ साल उजाडलं. आता तो म्हातारा झाला होता. कुत्र्याचं आयुष्य १२-१४ वर्षांचं असतं. त्याचे १३२ निवडक अंतर्नाद दिवस भरले होते. तो आता जख्ख म्हातारा झाला होता. त्याला नीटसं उभं राहता येत नव्हतं. पाय लुळे झाले होते. पायऱ्यावरून उतरताना त्याचे पाय घसरत, तो कोलमडून पडे. तो म्हातारा झाला आणि त्याला सांभाळणं हे आमचं कर्तव्य बनलं. पण सुरुवातीपासून त्याची एक शारीरिक दुर्बलता होती. त्याचे केस जायचे. अंगावर चट्टे पडायचे. आतली स्कीन दिसायची. आणि एकूणच तो घाणेरडा दिसायचा. पण त्यावर एक लोशन मिळायचं ते लावलं की तो बरा व्हायचा. केस पुन्हा यायचे. आता तो पार म्हातारा झाला. त्याचे केस गळून अनेक चट्टे पडले. त्यात त्याच्या अंगावर गोमाशा झाल्या, हे कमी की काय, म्हणून उवा झाल्या. किडे पडायला लागले. तो फार ओंगळ दिसायला लागला. तो नेमका आमच्या फ्लॅटच्या दाराशी येऊन बसायचा. आणि अशा कुलंगी कुत्र्याला आम्ही असे घरासमोर बसू कसे देतो, असं घरी येणाऱ्या थोरा-मोठ्यांना वाटायला लागायचं. जंतुनाशक औषधानं त्याला अंघोळ घातली, लोशन लावलं पण त्याचा रोग हायला तयार नव्हता. काय करावं हे मला कळत नव्हतं. खूप विचार केला आणि एका व्हेटर्नरी डॉक्टरला फोनवरून ही अडचण सांगितली. त्यांनी सल्ला दिला, एक इंजेक्शन आहे ते त्याला दिलं, की तो शांतपणे झोपेल आणि पुन्हा उठणारच नाही. मी डॉक्टरांना येऊन ते इंजेक्शन द्यायला सांगितलं, तुमची जी काही फी असेल ती देण्याचं आश्वासन दिलं. दरम्यान अपार्टमेंटच्या वॉचमनला योग्य अशी जागा बघून खड्डा खणायला सांगितलं. तो कुत्रा मेला, की त्याला त्वरित पुरून टाकता येईल ह्य त्यामागचा विचार ! त्यानं रॉकीला अपार्टमेंटमध्ये पुरण्याऐवजी माझ्या शेतावर पुरण्याचा सल्ला दिला. म्हटलं ठीक आहे. तसं करू. एखाद्या फुलझाडाच्या मुक्कामी त्याला पुरून यकू. पुढं त्याचं खत होईल. झाडाला छान फुलं येतील. रॉकीची आठवण त्या फुलांच्या गंधातून वास करून राहील. दोन दिवस डॉक्टरांची वाट पाहत होतो. ते आले नाहीत, रॉकीला पाहत होतो. मनात आता चलबिचल व्हायला लागली. त्याला असं मारणं मनाला रुचेना. डॉक्टरला येण्याची आठवण करायला मन तयार होईना, रॉकी राहून गेला. त्याचं त्वरित मरण टळलं. तो कसाबसा खुरडत चालत होता. माझ्या मनाशी कुठेतरी विचार चालू होता. विचारचक्र फिरत होतं. एक कथा आकार घेत होती. कथेचा जन्म मी अनुभवत होतो. कथेनं मनाशी आकार घेतला. मी पेन उचललं, कागदावर लिहायला लागलो. त्यातून माझी 'हार्टफेल' ही कथा (नंतर बदललेले नाव सुटका) जन्माला आली. एखाद्या घटनेतून, प्रसंगातून कथा कशी आकार घेते, त्या बीजाला अंकुर कसे फुटतात, पुढे त्याच्या फांद्या कशा होतात हे पाहणं रंजक असतं. म्हणून मी ती कथा पुढे देतो आहे. वाचकांनीच मूळ घटना, प्रसंगांशी तुलना करून कथा कशी अवतरते हे पाहायचं आहे. तर ती कथा पुढे वाचकांची वाटच पाहत आहे.