पान:निवडक अंतर्नाद.pdf/१३६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

"आमच्या घरात तो आल्यावर त्याचे हे किडे आमच्या हॉलच्या भिंतीवर चढतात. त्यांना मारायचा मी प्रयत्न केला तर भिंतीवर रक्ताचे डाग उमटले. ओल्या कापडाने पुसायचा प्रयत्न केला तर ती लाली भिंतीवर पसरली... त्याला घरात येऊ द्यायचं नाही म्हटलं तर दार निरंतर लावून घ्यावं लागेल. बरं! हाकलून तरी किती वेळा देणार! तेव्हा तू त्याचं काय करणार आहेस? तेच विचारायला आलोय मी.” देशपांडेंनी आपल्या येण्याचं कारण स्पष्ट केलं. "तुम्ही म्हणताय ते खरं आहे. तो म्हातारा तर झालाच आहे, पण त्याच्या अंगावर किडे झाले आहेत. पूर्वी आमच्या ऑफिसचा शिपाईं महिन्यातून दोनएक वेळा तरी त्याला अंघोळ घालायचा, पण तो शिपाई आता रिटायर्ड झालाय, त्यामुळे प्रश्न आला आहे तुमची खूप अडचण होते आहे हे मला मान्य आहे. पण मी त्यावर एक उपाय शोधून काढलाय." अशोक जायची चुळबूळ करतो आहे असं जगन्नाथला उगीचच वाटायला लागलं. देशपांडेंना शक्य तो त्वरित निरोप द्यायला हवा होता. जगन्नाथला ते जाणवत होतं. "पण तू काय करणार आहेस हे तरी सांग, म्हणजे आम्हाला किती दिवस वाट पाहावी लागेल हे तरी कळेल.” "काही नाही. मला दोन-तीन दिवस अवधी द्या. मी त्याचा बंदोबस्त करतो आहेच, ” जगन्नाथ म्हणाला. "ते ठीक आहे. पण दोन-तीन दिवसांत काय करणार आहेस हे तरी कळू दे?” देशपांडेंनी डोळ्याला डोळा भिडवून विचारले. "एक व्हेटर्नरी डॉक्टर आहे माझा मित्रच आहे तो. लग्नाला म्हणून दोन-तीन दिवस बाहेर गावी गेलाय, तो आला की इकडे येणार आहे " जगन्नाथनं खुलासा केला. "म्हणजे तो आला की लगेच प्रश्न मिटणार आहे का? औषधाने कदाचित किडे मारले जातील. पण तो लूत भरलेल्या कुत्र्यासारखा दिसतोय. काही वेळा आमच्या दारातच येऊन बसतो हाकलला तरी घरी येणाऱ्या मित्रांच्या पाव्हण्यांच्या दृष्टीने ते ठीक नाही.” "हे पाहा देशपांडेसाहेब, मी त्याचा कायमचा बंदोबस्त करणार आहे. तुम्ही निश्चिंत राहा." "म्हणजे तू करणार आहेस तरी काय?” देशपांडेंनी सरळ सवाल केला. "डॉक्टरांनी सांगितलंय, त्याला एक इंजेक्शन देण्यात येईल. शांतपणे त्याला झोप येईल आणि नंतर तो उठणारच नाही. पुढचं जे काही करायला लागेल, त्याचीही व्यवस्था झाली आहे.” जगन्नाथनं त्वरेनं खुलासा केला. त्याला अशोक जाईल हीच एक काळजी लागून राहिली होती. "मग ठीक आहे. गुड़ डिसिजन! दोन दिवस आम्हीही कळ काढायला हरकत नाही.” देशपांडे एवढं बोलून जायला उठले. “जाताय? चहा तरी घेऊन जा, ” औपचारिकता म्हणून जगन्नाथ बोलला. “ओः नो! मला घरी जायलाच हवं, मुलाचा अमेरिकेतून फोन येणार आहे. कदाचित आलाही असेल," देशपांडे म्हणाले आणि चालायला लागले. देशपांडे गेले आणि दोन मिनिटं कुणी बोललंच नाही. अशोक विचारमग्न होता. जगन्नाथ तो काही बोलण्याची वाट पाहत होता. एवढ्यात कलावतीबाई चहाचा ट्रे घेऊन आल्या. दोघांना चहा दिला. त्याही काही बोलल्या नाहीत. दोघेही निमूटपणे चहा पीत होते. चहा पिऊन झाल्यावर अशोकनं मनगटावरच्या घड्याळात किती वाजले ते पाहिलं. “मी उद्या -परवा तुला फोन करून कळवतो,” तो भावाला म्हणाला. “आता काय कळवायचं राहिलंय? सरळ दादांना घेऊन जायचं पाह्य हिच्या सर्व तपासण्या करण्यापूर्वी दोन दिवस दवाखान्यात अॅडमिट करायचं आहे. डॉ. साठ्यांनी हे 'मस्ट' असल्याचं सांगितलंय,” निक्षून सांगण्याच्या आविर्भावात जगन्नाथ बोलला. अशोक उठला. वडलांच्या कॉटजवळ गेला. काही वेळ तो त्यांना पाहत होता. त्यांचे डोळे मिटलेले होते. खाली वाकून त्यानं हलक्या आवाजात हाक दिली - "दादाऽऽ" कुठलाही प्रतिसाद आला नाही. अशोकनं पुन्हा एकवार हाक मारली. दादा डोळे उघडून पाहणार नाहीत याची खात्री असूनसुद्धा ! मग तो जायला वळला. "वहिनी! मी चलतो. पुन्हा येतोय, ” चहाचा ट्रे न्यायला आलेल्या वहिनींना तो बोलला, जगन्नाथचा निरोप घेतला आणि घरातून बाहेर पडला. बाहेर मोटारसायकल होती. ती सुरू करून तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी अशोक दाढी करत होता. बायकोला हे सारं कसं सांगावं याचा विचार करत होता. एवढ्यात फोनची घंटी वाजली. त्यानं साबण लावायचा ब्रश समोरच्या आरशाच्या स्टँडवर ठेवला फोन घेतला. "हॅलोऽऽ, अशोक, मी जगन्नाथ बोलतोय. गेले. पहाटेच लक्षात आलं. डॉक्टर साठ्यांना बोलावलं. त्यांनी तपासणी करून सांगितलं दादांना हार्टअॅटॅक आला म्हणून तू लवकर यायचं पाह्य आम्ही पुढच्या तयारीला लागतोय. " फोन बंद झाला. अशोक काही क्षण स्तब्ध झाला. कालची सारीच चर्चा दादांनी ऐकली असेल काय? तशात देशपांडे आले. त्यांनी कुत्र्याचा विषय काढला. दादांना ते सारं कळत असेल काय ? या विचारातच तो आरशासमोर उभा राहून दाढीला साबण फासायला लागला. (दिवाळी २०१४) (कथेचे मूळ शीर्षक: हार्टफल) निवडक अंतर्नाद १३५